घोषित-अघोषित भारनियमनाने फोडला औरंगाबादकरांना घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 06:43 PM2022-04-23T18:43:42+5:302022-04-23T18:44:04+5:30

वाढते तापमान आणि विजेच्या वापरात झालेली वाढ यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई वगळता उर्वरित कार्यक्षेत्रात विजेची २४,५०० ते २५,००० मेगावॅटएवढी मागणी आहे.

Sweat Aurangabadkars burst with declared-undeclared weight regulation | घोषित-अघोषित भारनियमनाने फोडला औरंगाबादकरांना घाम

घोषित-अघोषित भारनियमनाने फोडला औरंगाबादकरांना घाम

googlenewsNext

औरंगाबाद : उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने अंगाची काहीली होत असतानाच विजेच्या घोषित-अघोषित भारनियमनाने शहरवासीयांना चांगलाच घाम फोडला आहे. औरंगाबाद शहर मंडलातील ८८ पैकी २९ फिडर हे जास्त थकबाकी व वीज वितरण हानीचे आहेत. तिथे सव्वाचार ते पाच तास, तर इतर फिडरवर दीड ते चार तास दोन टप्प्यांत नियोजित लोडशेडिंगचे महावितरणचे परिपत्रक आहे.

विजेची मागणी व पुरवठा यामध्ये मोठी तूट निर्माण झाली आहे. महावितरणकडून राज्यातील २ कोटी ८० लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी सार्वजनिक व खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी केली जाते. वाढते तापमान आणि विजेच्या वापरात झालेली वाढ यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई वगळता उर्वरित कार्यक्षेत्रात विजेची २४,५०० ते २५,००० मेगावॅटएवढी मागणी आहे. जिल्ह्यात सुमारे ११ कोटी युनिटची मागणी वाढली आहे. सुमारे २,३०० ते २,५०० मेगावॅट विजेची तूट असून, शहरात दीड ते पाच तासांचे भारनियमन होत आहे. शुक्रवारी (दि. २२) महानिर्मिती आणि अदानी या दोन्ही वीजनिर्मिती कंपन्यांनी महावितरणला अधिकची वीज उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. विजेच्या उपलब्धतेनुसार मागणी व पुरवठा यातील तूट कमी झाल्यास भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी होईल, असे महावितरणकडून कळविण्यात आले.

बिल भरल्यास कमी होऊ शकते लोडशेडिंग
वीजबिल भरल्यास फिडरची कॅटॅगिरी बदलेल. त्यानुसार लोडशेडिंगही कमी होईल. जिल्ह्यात सर्वाधिक वीज गळती आणि बिलांचा भरणा कमी असलेले जी १, जी २, जी ३ हे फिडर आहेत, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

वीज तुटीमुळे अतिरिक्त वीज उपलब्ध करणे आणि मागणी कमी करण्याच्या उपाययोजनांवर अवलंबून सध्याच्या भारनियमनाचे नियोजन केले. विजेच्या तुटीमुळे इमर्जन्सी लोडशेडिंग करावे लागते. सध्या पुरवठा वाढण्याची शक्यता दिसत नाही.
- डाॅ. मंगेश गोंदावले, सहव्यवस्थापकीय सहसंचालक, महावितरण प्रादेशिक कार्यालय

वीजग्राहक म्हणतात...
दिलेल्या वेळापत्रकानुसार वीज गेली, तर कामांचे नियोजन होऊ शकते. उकाड्यात दुपारी आणि रात्रीचा वीज पुरवठा खंडित नकोच. पाणी येते त्या वेळेतही वीज जाऊ नये.
- श्रीकांत बोरुडे, वीजग्राहक, चिकलठाणा

केव्हाही वीज जात आहे. त्यामुळे कामेही होत नाहीत. शिवाय घरात उकाड्यामुळे थांबणेही शक्य होत नाही. वृद्धांसह लहान मुलांचे तर खूप हाल होत आहेत.
- देवकी जाधव, वीजग्राहक, अविष्कार कॉलनी

सध्या उपवास सुरू आहेत. रात्री १० ते १ वाजेपर्यंत वीज नव्हती. दुपारीसुद्धा तीन तास वीज खंडित होती. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.
- सय्यद तारीक, वीजग्राहक, जटवाडा

Web Title: Sweat Aurangabadkars burst with declared-undeclared weight regulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.