विज्ञानाची गोडी वाढणार;लवकरच विद्यापीठात ‘सायन्स ॲण्ड टेक्नाॅलाॅजी पार्क’ची पर्वणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 12:53 PM2021-08-23T12:53:53+5:302021-08-23T12:56:02+5:30
Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University's 63rd Anniversary : विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न
औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ६३ व्या वर्षात पदार्पण करत असतांना सायन्स ॲण्ड टेक्नाॅलाॅजी पार्कच्या कामाने गती घेतली आहे. दहा कोटी खर्चून विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी उभारण्यात येणारे हे दालन विद्यार्थी, विज्ञानप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे, तर विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी या प्रकल्पात सात गॅलरींसह एमपी थिएटर असलेले हे दालन २८ फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञान दिनी सर्वांकरिता खुले करण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत. ( The sweetness of science will increase; soon science and technology park will be started in the Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University)
सायन्स ॲण्ड टेक्नाॅलाॅजी पार्कसाठी २५ कोटींचा प्रस्ताव विद्यापीठाकडून देण्यात आला होता. तत्कालीन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांनी दहा कोटींची मंजुरी दिली होती. आतापर्यंत आठ कोटींचे अनुदान विद्यापीठास प्राप्त झाले. पाच कोटींतून विद्यापीठ परिसरात नियोजित सायन्स पार्कसाठी इमारत पूर्णत्त्वास आली आहे. राज्य शासनाने प्रयोगशाळा, फर्निचर खरेदीसाठी २ कोटी, तर वैज्ञानिक उपकरणे खरेदीसाठी ३ कोटींची मान्यता दिली. या पार्कचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी कुलगुरु डाॅ. प्रमोद येवले यांनी विज्ञान तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डाॅ. भालचंद्र वायकर यांच्यासह प्राध्यापक, अधिकाऱ्यांची समिती बनवून कामाला गती देण्याच्या सूचना केल्या. येत्या २८ फेब्रुवारीला हे दालन सर्वांसाठी खुले करता येईल, यादृष्टीने विद्यापीठाचे नियोजन सुरू आहे. या सध्या मिळालेल्या निधीशिवाय इतर विकास करण्यासाठी आणखी १० कोटींची गरज आहे. तो निधी उपलब्ध करण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न सुरू आहेत.
अनुभवता येईल विज्ञान
हसत खेळत विज्ञान सर्वसामान्याला कळावे अशा पद्धतीने या पार्कची मांडणी असेल. मूलभूत विज्ञान विद्यार्थ्यांना कळण्यासाठी विविध संशोधन, संशोधक, शोधाचे माॅडेल्स, त्यांची काम करण्याची पद्धत चित्र, दृकश्राव्य स्वरुपातून विद्यार्थ्यांना विविध सात गॅलरीतून अनुभवता येतील. तसेच यांत्रिकी तंत्रज्ञान कसे काम करते, याचे प्रात्यक्षिक, वैज्ञानिक माहितीचे हे भांडार असणार आहे. यंत्र प्रत्यक्षात कशी काम करतात, त्यामागचे विज्ञान विद्यार्थ्यांना अनुभवता येईल.
वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी मदत होईल
माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात विज्ञान मूलभूत विज्ञानाचे महत्त्व आणखी वाढले आहे, अशा काळात शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी वाढावी व त्यांच्या वैज्ञानिक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात, या हेतूने सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क महत्त्वपूर्ण ठरेल. विद्यापीठातील अनेक ऐतिहासिक व पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ठिकाणात या पार्कची भर पडेल.
- डाॅ. प्रमोद येवले, कुलगुरु, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
अशा असतील सुविधा :
-एमपी थिएटरसह वैज्ञानिक करमणूक दालन
-डाॅ. सी. व्ही. रमण गॅलरी
-डाॅ. हरगोविंद खुराना गॅलरी
-सर जे. जे. बोस गॅलरी
-सुश्रुत गॅलरी
-हेरिटेज गॅलरी
-वैज्ञानिक शोधांच्या संकल्पना, पोस्टर, माॅडेलद्वारे सादरीकरण
प्रकल्प दृष्टिक्षेपात
-केंद्र शासनाकडे २५ कोटींचा प्रस्ताव
-केंद्राकडून ८ कोटींची मान्यता
-सायन्स टेक्नाॅलाॅजी पार्क इमारतीसाठी ५ कोटींचा खर्च
-प्रयोगशाळा, फर्निचर २ कोटी
-वैज्ञानिक उपकरणे ३ कोटी
-आणखी १० कोटींची गरज