सरावासाठी रात्री गोदावरी पोहून जाण्याचे चीज झाले; कुस्तीपटू सोनालीची 'खेलो इंडिया'साठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 07:34 PM2022-03-21T19:34:25+5:302022-03-21T19:35:26+5:30
गावातील प्रतिष्ठितांपासून ते रिकामटेकड्यांचा कुस्ती खेळणारी मुलगी म्हणजे चेष्टेचा विषय ठरत असे.
पैठण : हरियाणा येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी रेसलिंग फ्री स्टाईल महिला चॅम्पियनशिप स्पर्धेत पैठणची लेक सोनाली गिरगे हिने झेंडा फडकावला आहे. या विजयानंतर सोनालीची एप्रिल महिन्यात होणाऱ्या खेलो इंडिया ऑर्गनायझेशन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पैठण तालुक्यातील नायगाव या छोट्याशा गावातील सोनालीने राष्ट्रीय पातळीवर नाव कमावल्याने तिच्याकडून कुस्तीक्षेत्राच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
१४ ते १६ मार्चदरम्यान चौधरी बन्सीलाल युनिव्हर्सिटीच्या (भिवानी, हरियाणा) वतीने राष्ट्रीय पातळीवरील महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून पैठण येथील ताराई महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनाली दीपक गिरगे या स्पर्धेत उतरली होती. ५० किलो वजनी गटात १३२ महिला कुस्तीपटूंत तिने चौथा क्रमांक पटकावत खेलो इंडिया ऑर्गनायझेशन स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे.
जालना येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत ५० किलो गटात विजेतेपद पटकावून सोनालीने हरियाणातील स्पर्धेत प्रवेश मिळविला होता. याबाबत ‘लोकमत’ने तिच्या कर्तृत्वाला वाव देणारे वृत्त प्रकाशित केले होते. ग्रामीण भागात मुलीने कुस्ती खेळणे म्हणजे मोठे धाडसाचे काम होते.
गावातील प्रतिष्ठितांपासून ते रिकामटेकड्यांचा कुस्ती खेळणारी मुलगी म्हणजे चेष्टेचा विषय ठरत असे. यामुळे सोनालीचे वडील दीपक गिरगे यांच्यावर मोठा सामाजिक दबाव यायचा. अशा प्रतिकूल परिस्थितीत समाजाची पर्वा न करता ते आपल्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आणि सोनालीच्या कुस्तीच्या कारकिर्दिला प्रारंभ झाला. गावात मातीत कुस्तीचा सराव करणाऱ्या सोनालीने प्रतिकूल वातावरण, सुविधांचा अभाव असताना अपूर्व इच्छाशक्तीवर केलेली आगेकूच राज्यातील लेकींसाठी मोठी प्रेरणादायी ठरणार आहे.
रात्रीच्या अंधारात गोदावरीतून पोहून जात होती सरावाला
सोनालीचे गाव नायगाव हे गोदावरीच्या एका काठावर तर सरावासाठी दुसऱ्या काठावरील मुंगी (ता. शेवगाव) येथे जावे लागत होते. रात्री परत येताना होडी नसायची तेव्हा गोदावरीच्या पाण्यात उडी मारून गावाचा किनारा गाठावा लागत होता. समाज काय म्हणेल याची पर्वा न करता मी लेकीच्या पाठीशी उभा राहिलो. तिने बापाचे नाव कमावले, असे सांगताना दीपक गिरगे यांचे डोळे पानावले.