अन्य ठिकाणी स्विमिंग पूल सुरु, मात्र औरंगाबादेत का नाही ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 05:09 PM2021-10-19T17:09:29+5:302021-10-19T17:12:02+5:30
Swimming Pool Closes due to Corona Virus कोरोना संकटामुळे हा जलतरण तलाव बंद पडल्याने अनेकांना सागरी जलतरण स्पर्धेसाठी दुसरीकडे सराव करावा लागला.
- जयंत कुलकर्णी
औरंगाबाद : वर्षभरात तब्बल ७ हजार पोहणाऱ्यांची संख्या. महाराष्ट्रात सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारा औरंगाबाद महानगर पालिकेचा सिद्धार्थ जलतरण तलाव अव्वल म्हणून गणला जातो. मात्र, कोरोना संकटामुळे हा जलतरण तलाव बंद आहे. कोरोनारुपी संकट आता निवळत आहे. बाजारपेठ सुरळीत झाली आहे. अनेक उद्योग सुरु आहेत. व्यायामशाळाही सुरु झाल्या आहेत. अनेक खेळांना परवानगी मिळाली आहे. पुणे येथे गत महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी शासनाने परवानगी दिली. मग औरंगाबाद येथे जलतरणिका सुरु करण्यास परवनगी का दिली जात नाही, असा प्रश्न क्रीडाप्रेमी उपस्थित करीत आहेत.
२६ मे १९९४ रोजी महानगर पालिकेचा सिद्धार्थ जलतरण तलाव सुरु झाला. २१ बाय २५ मीटर असलेला १६ फूट खोली असलेला ऑलिम्पिक आकाराचा मराठवाड्यातील पहिला जलतरण तलाव म्हणून सिद्धार्थ जलतरण तलावाची ओळख आहे. लहान मुले व नवशिक्यांसाठी १० बाय २१ व ४ फूट खोल असा छोटासा वेगळा जलतरण तलावही येथे आहे. तेव्हापासून उत्पन्नाच्या दृष्टीने या जलतरण तलावाचा आलेख नेहमीच उंचावत राहिला आहे. सर्वसामान्यांना परवडणारा आणि गोरगरिबांपासून ते श्रीमंत वर्ग एकाच ठिकाणी आणणारे हे व्यासपीठ आहे. मात्र, २८ वर्षांनंतर कोरोना संकटामुळे प्रथमच दीड वर्षांपासून हा जलतरण तलाव बंद आहे. या जलतरण तलावावर १९९८ ते २००२ यादरम्यान राष्ट्रीय जलतरण पोलिसांच्या स्पर्धा रंगल्या होत्या. तसेच राज्यस्तरीय अनेक स्पर्धाही या स्विमिंगपूलवर झाल्या आहेत. मात्र, कोरोना संकटामुळे हा जलतरण तलाव बंद पडल्याने अनेकांना सागरी जलतरण स्पर्धेसाठी दुसरीकडे सराव करावा लागला. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा २० ते २५ जणांचा असा मोठा संघ असायचा. जलतरण तलाव बंद असल्यामुळे खेळाडूंचा सरावच झाला नाही. त्यामुळे पुणे येथे २५ ते २७ सप्टेंबरदरम्यान झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ५ ते ६ जणांचाच संघ पाठवावा लागला.
७० लाख रुपयांचा खर्च
कोरोनाकाळदरम्यान सिद्धार्थ जलतरण तलावाचे नूतनीकरण करण्यात आले. यात स्विमिंगपूलला लागलेल्या गळतीची दुरुस्ती करण्यात आली. तसेच नवीन टाईल्स बसवण्यात आल्या व काँक्रिटीकरणही करण्यात आले.
सिद्धार्थ जलतरणिकेचे पाच वर्षांचे उत्पन्न
१५ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ : ४७ लाख ४१ हजार ६००
१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ : ४२ लाख ६५ हजार ७००
१ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ : ९ लाख ४५ हजार ४७५
१ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ : ६६ लाख ८६ हजार ३१५
१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ : ७६ लाख ७६ हजार ५००.
निरोगी आरोग्यासाठी सिद्धार्थ जलतरणिका सुरू करणे आवश्यक आहे
सागरी जलतरण तलाव स्पर्धेसाठी आम्हाला शहराजवळील छोट्या-मोठ्या तलावात सराव करावा लागे. जलतरण तलाव सुरू झाल्यास खेळाडूंना सुरळीत सराव करता येईल.
- मोहम्मद कदीर खान, ज्येष्ठ जलतरणपटू
दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जलतरण तलाव बंद आहे. आता सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. पुणे येथेही खेळाडूंना सरावासाठी जलतरणिका सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबादेतही सर्वसामान्यांना परवडणारा सिद्धार्थ जलतरण तलाव सुरू करावा. त्यामुळे आगामी स्पर्धेसाठी खेळाडूंना भक्कम तयारी करता येईल.
- अजय दाभाडे, जलतरण प्रशिक्षक, राष्ट्रीय खेळाडू.
पुणे येथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे औरंगाबाद येथेही जलतरणिका सुरू करण्याची परवानगी शासनाने द्यावी, अशी आमची मागणी आहे. कोरोना संकटामुळे दीड वर्षांपासून सिद्धार्थ जलतरण तलाव बंद होता. त्यामुळे खेळाडू सरावापासून वंचित होते. तसे पाहता प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी आणि आरोग्याच्या दृष्टीने पोहणे हा उत्तम व्यायाम आहे. आता कोरोनाची परिस्थिती निवळत आहे. त्यामुळे शासनाने जलतरणिका सुरू करण्यास परवानगी द्यावी.
- निखिल पवार, जलतरण प्रशिक्षक, राष्ट्रीय खेळाडू