‘स्वाईन फ्लू’ची पुन्हा धास्ती
By Admin | Published: March 25, 2017 10:54 PM2017-03-25T22:54:34+5:302017-03-25T22:55:26+5:30
उस्मानाबाद : शेजारील सोलापूरसह पुणे जिल्हा व परिसरात स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आ
उस्मानाबाद : शेजारील सोलापूरसह पुणे जिल्हा व परिसरात स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे़ मागील महिन्यातच या आजाराने उमरगा तालुक्यातील एका रुग्णाचा बळीही गेला असून, शहरातील काहींना स्वाईन फ्लूची औषधे देण्यात आली आहेत़ परिणामी स्वाईन फ्लूची अनेकांना धास्ती लागली असून, या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन विभागासह इतर यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे़
गतवर्षी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात स्वाईन फ्लू सदृश्य रुग्ण आढळून आले होते़ मात्र, प्रशासनाने वेळीच केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णांवर योग्य उपचार झाले होते़ मध्यंतरी गायब झालेले स्वाईन फ्लूचे विषाणू पुन्हा फोफावताना दिसत आहेत़ मागील महिन्यातच उमरगा तालुक्यातील एका रुग्णाचा या आजाराने बळी घेतला आहे़ तर उस्मानाबाद शहरातील एका कुटुंबातील सात जणांना जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लूची औषधे देण्यात आली आहेत़ मागील काही दिवसांपासून सर्दी, खोकला,अंगदुखीसह इतर आजाराचे रुग्ण वाढले असून, अनेकांनी रुग्णालयात उपचार घेणे सुरू केले आहे़ विशेष म्हणजे उस्मानाबाद येथून सोलापूर येथे उपचारासाठी गेलेल्या काही रुग्ण स्वाईनफ्लूसदृश्य आढळून आल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर संबंधित रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत़ विशेषत: सोलापूर व पुणे येथे स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले असून, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे़ या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे़ पुण्यासह सोलापूर येथे जिल्ह्यातून शेकडो नागरिक विविध कामासाठी प्रवास करतात़ त्यामुळे ‘पुणे टू उस्मानाबाद’ किंवा ‘सोलापूर टू उस्मानाबाद’ या मार्गाने स्वाईन फ्लूचा आजार जिल्ह्यात फोफावण्याची शक्यता नाकारता येत नाही़ या आजरापासून बचाव करण्यासासाठी नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेणे गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालयातही आयसोलेशन विभाग तयार करण्यात आला आहे़ स्वाईन फ्लूच्या गोळ्या, लहान मुलांची औषधे, व्हेंटेलेटरसह स्वॅब घेण्याच्या ४० किट जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहेत़ याशिवाय अयसोलेशन विभागात चार वैद्यकीय अधिकारी, सहा कर्मचारी, वर्ग चारचे सहा कर्मचारीही कार्यरत आहेत़ रुग्णालयात सर्दी-खोकल्यासह अंगदुखीसाठी येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले जात आहेत़