औरंगाबादेत स्वाईन फ्लूने आणखी एका रुग्ण दगावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 11:26 PM2018-10-08T23:26:05+5:302018-10-08T23:26:35+5:30
स्वाईन फ्लूचे जिल्ह्यात रुग्ण वाढत असून, सोमवारी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. अशोक नाथा शेंडे (५०) असे मृताचे नाव आहे.
औरंगाबाद /करमाड : स्वाईन फ्लूचे जिल्ह्यात रुग्ण वाढत असून, सोमवारी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. अशोक नाथा शेंडे (५०) असे मृताचे नाव आहे.
औरंगाबाद तालुक्यातील जळगाव फेरण येथील शेतकरी अशोक शेंडे हे सात दिवसांपासून थंडीतापाने आजारी होते. शेकटा, जालना येथे खाजगी रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. उपचार सुरूअसताना सोमवारी दुपारी एक वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी,३ मुले,२ भाऊ,आई असा परिवार आहे. ते बांबू खरेदीसाठी मलकापूर, अमरावती येथे गेले होते. त्यानंतर ते आजारी पडल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
घरांची तपासणी
लाडसावंगीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान राऊत म्हणाले की, अशोक शेंडे यांनी आमच्याकडे आजाराच्या वेळी तपासणी केल्याची नोंद नाही. त्यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आली असून, सोमवारी फेरण जळगाव येथे १५० घरांची तपासणी केली. यावेळी २ तापाचे व २ सर्दी खोकल्याचे रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले.
घाटीत एक रुग्ण
शहरात गेल्या आठवडाभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आजघडीला घाटीत एका संशयित रुग्णावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली. घाटीत टॅमी फ्लूचा पुरेसा साठा असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.