स्वाइन फ्लू म्हटले की, घाम फुटायचा, आता रुग्णच नाहीत; कोरोनाचेही असेच होईल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 07:10 PM2022-02-02T19:10:07+5:302022-02-02T19:10:26+5:30

देशभर २००९ मध्ये स्वाइन फ्लूने धुमाकूळ घातला होता. औरंगाबाद शहरात स्वाइन फ्लूचे १००हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते, तर २५ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता.

Swine flu, he said, used to break out in sweat, no longer patients; Will the same happen to Corona? | स्वाइन फ्लू म्हटले की, घाम फुटायचा, आता रुग्णच नाहीत; कोरोनाचेही असेच होईल ?

स्वाइन फ्लू म्हटले की, घाम फुटायचा, आता रुग्णच नाहीत; कोरोनाचेही असेच होईल ?

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनापूर्वी एका आजाराने आरोग्य यंत्रणेसह सर्वसामान्यांना बेजार केले होते. तो आजार म्हणजे स्वाइन फ्लू. दहा वर्षांपूर्वी या आजाराचे नाव काढले तरी अनेकांना घाम फुटायचा. मात्र, आता स्वाइन फ्लूचे रुग्ण समोर येणे बंद झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून दहशत पसरविणाऱ्या कोरोनाचीही नंतर अशीच अवस्था होईल, अशी शक्यता नाकारता येणार नाही.

देशभर २००९ मध्ये स्वाइन फ्लूने धुमाकूळ घातला होता. औरंगाबाद शहरात स्वाइन फ्लूचे १००हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते, तर २५ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २०१० मध्येही हे प्रमाण काही प्रमाणात सारखेच होते. त्यानंतर २०११ मध्ये स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. त्यानंतर एक वर्षाची विश्रांती घेऊन २०१२ मध्ये स्वाइन फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले होते. १० वर्षांनंतर म्हणजे मार्च २०२० मध्ये कोरोनाने डोके वर काढले. कोरोनाच्या विषाणूत सतत बदल होत आहे. परिणामी, तिसऱ्या लाटेला सामोरे जावे लागत आहे. मात्र, यापुढे कोरोनाचीही स्थितीही स्वाइन फ्लूप्रमाणे होते का, याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

राज्यात तेव्हा काय होती स्थिती
राज्यात २०१० ते २०१७ दरम्यान अनेकांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला. सर्वाधिक मृत्यू पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यांत झाले. तेव्हाही ६० टक्के मृत्यू हे २१ ते ५० या वयातील व्यक्तींचे झाल्याने अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. कोरोनाने स्वाइन फ्लूपेक्षा अधिक कहर केला आहे.

औरंगाबाद विभागातील स्वाइन फ्लूची स्थिती
औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. या चारही जिल्ह्यात २०१८ मध्ये एकूण ५१, सन २०१९ मध्ये ९६ आणि सन २०२० मध्ये ६ स्वाइन फ्लूच रुग्ण आढळले होते, तर सन २०२१ ते आतापर्यंत एकाही रुग्णाची नोंद झाली नसल्याची माहिती या कार्यालयातर्फे देण्यात आली.

साथ संपण्याची प्रतीक्षा
सध्या स्वाइन फ्लूचे रुग्ण नाहीत. विषाणूजन्य आजार कधी कमी, तर कधी जास्त होत असतात. कोरोनाचे पुढे काय होईल, हे आताच सांगणे कठीण आहे. साथ संपल्यानंतरच सगळे स्पष्ट होईल.
- डाॅ. सुनील गायकवाड, फिजिशियन, जिल्हा रुग्णालय

Web Title: Swine flu, he said, used to break out in sweat, no longer patients; Will the same happen to Corona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.