चिंतेत भर! औरंगाबादेत स्वाईन फ्ल्यूने एकाचा बळी; रुग्णांची संख्या पाच दिवसांत दुपटीने वाढली
By संतोष हिरेमठ | Published: September 1, 2022 05:49 PM2022-09-01T17:49:23+5:302022-09-01T17:50:26+5:30
औरंगाबाद जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनानंतर आता स्वाईन फ्लूचा विळखा घट्ट होत असल्याची परिस्थिती आहे. शहरातील एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अवघ्या ५ दिवसांत दुपटीने वाढली आहे. सध्या शहरात ३० पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाबरोबरच आता स्वाइन फ्लू नियंत्रणाचेही आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. स्वाइन फ्लूच्या संरक्षणासाठी शासनाद्वारे प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. अतिजोखमीच्या व्यक्तींनाच ही लस दिली जात आहे.
अनेक जण काही लक्षणे आढळल्यानंतर औषधी दुकानांतून औषधी घेतात. परंतु स्वत:च्या मनाने औषधी घेता कामा नयेत. काही लक्षणे असतील तर वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा. काही लक्षणे असतील तर आयसोलेशनमध्ये राहिले पाहिजे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.