छेडछाडीला प्रतिबंध केल्याने मुख्याध्यापकांवर तलवारीने हल्ला;रोडरोमिओ पुण्यातून अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 12:49 PM2022-02-05T12:49:12+5:302022-02-05T12:50:53+5:30

विद्यार्थी आवाराबाहेर पडत असताना शुक्रवारी दुपारी तीन वाजता आरोपी मज्जीद जमील शेख (रा. मक्रणपूर) हा त्याच्या दुचाकीवरून आल्यानंतर शाळेच्या प्रवेशद्वारामोर विनाकारण चकरा मारत होता.

Sword attack on principals for preventing harassment on girl students; Roadromeo arrested from Pune | छेडछाडीला प्रतिबंध केल्याने मुख्याध्यापकांवर तलवारीने हल्ला;रोडरोमिओ पुण्यातून अटकेत

छेडछाडीला प्रतिबंध केल्याने मुख्याध्यापकांवर तलवारीने हल्ला;रोडरोमिओ पुण्यातून अटकेत

googlenewsNext

कन्नड ( औरंगाबाद ) : छेडछाडीच्या प्रकरणास प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्नड शहराजवळील मुख्याध्यापकांसह अधीक्षक यांच्यावर रोडरोमिओने तलवारीने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी समोर आली. यात दोघेजण जखमी झाले होते. हल्ल्यानंतर फरार  झालेला आरोपी मज्जीद जमील शेख (२३, रा. मक्रणपूर) यास शहर पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले आहे. दिवसाढवळ्या तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याच्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.

कन्नड शहराजवळील कनकावतीनगरातील कर्मवीर काकासाहेब देशमुख शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब पंडित चव्हाण (५५) आणि अधीक्षक संतोष राधाकिसन जाधव हे शाळा सुटल्याने आवारात उभे होते. विद्यार्थी आवाराबाहेर पडत असताना शुक्रवारी दुपारी तीन वाजता आरोपी मज्जीद जमील शेख (रा. मक्रणपूर) हा त्याच्या दुचाकीवरून आल्यानंतर शाळेच्या प्रवेशद्वारामोर विनाकारण चकरा मारत होता. मुख्याध्यापक चव्हाण यांना पाहून तो त्यांच्याकडे आला व म्हणाला की, ‘स्कूल के सामने गाडीपर चक्कर मारते हुए मेरे फोटो निकालकर मेरे बाप को मोबाइल पे भेजता है,’ असे म्हणून वाद घालून शिवीगाळ केली. यासह ‘तेरे को देख लूँगा,’ अशी धमकी देऊन तो निघून गेला.

या घटनेबाबत मज्जीद याच्या वडिलांना समजावून सांगण्यासाठी शिक्षकांनी त्याच्या घरी जाण्याचे ठरविले; परंतु मक्रणपूरमधील त्याच्या घराकडे जाण्यापूर्वीच चौकात हातात तलवार घेऊन थांबलेल्या मज्जीदने संतोष जाधव याच्या डाव्या हाताच्या खांद्याच्या पाठीमागील बाजूस तलवारीने दोन वार करून त्यांना जखमी केले. यानंतर लगेच आबासाहेब चव्हाण यांना मारण्याच्या उद्देशानेे त्यांच्या मानेवर वार केला. मात्र, त्यांनी धडपड केल्याने वार त्यांच्या खांद्याच्या मागे लागला. दुसरा वार डाव्या कानावर बसला. सोबत असलेल्या शिक्षकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून गेला. 

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक दिनेश जाधव यांनी घटनास्थळ गाठून जखर्मीना ग्रामीण रुग्णालयात भरती केले. मुख्याध्यापक चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर मज्जीद यास ताब्यात घेण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक दिनेश जाधव यांनी तीन पथके तैनात केली. आज सकाळी पोलिसांच्या एका पथकाने पुणे येथून आरोपी मज्जीद जमील शेख यास ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन खटके करीत आहेत.

शिक्षकांकडून निषेध
कन्नड शहरात घडलेली घटना निंदनीय असून, आरोपीस कठोर शासन करावे तसेच या घटनेचा निषेध म्हणून तालुक्यातील सर्व शाळा आज, शनिवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. चोवीस तासांत आरोपीस अटक न केल्यास पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी निवेदनाद्वारे शुक्रवारी दिला होता. त्यानंतर आरोपीस चोवीस तासांत पकडण्याचे आश्वासन सहायक पोलीस निरीक्षक दिनेश जाधव यांनी शिक्षक संघटनांना दिले होते.

Web Title: Sword attack on principals for preventing harassment on girl students; Roadromeo arrested from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.