दुचाकीचा कट मारल्यामुळे दोन कुटुंबात तलवारबाजी
By राम शिनगारे | Published: February 14, 2023 08:09 PM2023-02-14T20:09:19+5:302023-02-14T20:10:34+5:30
जटवाडा रोडवरील घटना : दोन्ही कुटुंबाच्या विरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल
औरंगाबाद : एका महिलेस दुचाकीचा कट का मारला असा जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर वाद झाला. या वादाचे पर्यावसन एकमेकांवर तलवारीचे वार करण्यापर्यंत गेला. दोन्ही गट हर्सुल पोलिस ठाण्यात पोहचल्यानंतर त्याठिकाणीही पुन्हा हाणामारी झाली. ही घटना १२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणात परस्पर विरोधी खूनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे नोंदवले. तर पोलिस ठाण्याच्या आवारात गोंधळ घातल्यामुळे पोलिसांनी दोन्ही गटावर गुन्हा नोंदविला.
हर्सुल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय वाघमारे याने रितेश वाकेकर यांच्या भावजयीला दुचाकीचा जोरात कट मारला. याचा जाब विचारण्यात आल्यानंतर दोन कुटुंबात भांडण सुरू झाले. या भांडणाचे पर्यावसन हाणामारी आणि तलवारबाजीत झाले. रितेश सुरेश वाकेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अजय साहेबराव वाघमारे, शुभम रुपचंद वाघमारे, रुपचंद लक्ष्मण वाघमारे, सुभाष लक्ष्मण वाघमारे, सुमीत सुभाष वाघमारे, अनिल साहेबराव वाघमारे, राेहित सिताराम चव्हाण (रा. एकतानगर, जटवाडा रोड) यांच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला. त्याचवेळी सुभाष वाघमारे यांच्या फिर्यादीवरून युवराज सुरेश वाकेकर,राजेश सुरेश वाकेकर, रितेश सुरेश वाकेकर, सुरेश वामन वाकेकर, नंदकिशोर वामनराव वाकेकर, आशिष साबळे यांच्यासह तीन महिलांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपनिरीक्षक सुनील चव्हाण व रफिक शेख करीत आहेत.
पोलिस ठाण्याच्या समोर हाणामारी
दोन्ही गट तक्रार देण्यासाठी हर्सुल पोलिस ठाण्यात आल्यानंतर ठाण्याच्या समोरच दोन्ही गट एकामेकांमध्ये भिडले. पोलिस ठाण्याच्या समोरही दोन्ही गटात हाणामारी झाली. या प्रकरणात दोन्ही गटाच्या १९ जणांवर पोलिस अंमलदार सलीम हम्मीद सैय्यद यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.