स्थायी समितीतील बंडखोरांच्या तलवारी म्यान; ‘वाटा’घाटीनंतर मंगळवारी होणार बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 04:42 PM2018-09-22T16:42:59+5:302018-09-22T16:44:19+5:30
महापालिकेच्या स्थायी समितीमधील १६ पैकी तब्बल १४ सदस्यांनी सभापती राजू वैद्य यांच्या विरोधात बंड पुकारले होते.
औरंगाबाद : महापालिकेच्या स्थायी समितीमधील १६ पैकी तब्बल १४ सदस्यांनी सभापती राजू वैद्य यांच्या विरोधात बंड पुकारले होते. गुरुवारी बंडखोर सदस्य आणि सभापती यांची तब्बल तीन तास महापौर बंगल्यावर बैठक झाली. बैठकीत ३६ कोटी रुपयांच्या ठेक्यावरून उफाळलेल्या वादावर बराच वेळ चर्चा करण्यात आली. महापौर, सभागृहनेत्यांनी वादात मध्यम मार्ग काढला. त्यानंतर ‘वाटा’घाटी यशस्वी झाल्या. बंडखोर सदस्यांनी तलवारी म्यान करताच मंगळवारी स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मागील महिन्यात स्थायी समितीमध्ये घन कचऱ्याचा प्रकल्प उभारण्यासाठी ३६ कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. या ठरावाला मंजुरी देताना सदस्यांना सांगण्यात आले की, एक वर्षासाठी हे काम मायोवेसल या कंपनीला देण्यात येत आहे. अत्यंत छोटे काम असल्याचेही सांगण्यात आले. सदस्यांनी विश्वास ठेवून ठरावाला मंजुरी दिली. बैठक संपल्यावर सदस्यांनी ठरावाची सखोल माहिती घेतल्यावर आपली घोर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच सभापतींच्या विरोधात बंडाचा झेंडा रोवला. ठराव रद्द करा, विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात यावे आदी मागण्या केल्या. त्यामुळे सभापतींची चारही बाजूने कोंडी झाली होती.
स्थायी समितीच्या कोणत्याही बैठकीला आम्ही हजर राहणार नाही, असा इशाराच बंडखोर १४ सदस्यांनी दिला. स्थायी समितीमध्ये कोणताही ठराव मंजूर करण्यासाठी किमान ७ सदस्यांचे बहुमत असायला हवे. गुरुवारी महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन यांनी पुढाकार घेऊन महापौर बंगल्यावरच एका बैठकीचे आयोजन केले होते. बैठक तब्बल तीन तास सुरू होती. बैठकीत विविध मुद्यांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. सभापती बॅकफूटवर आले. त्यानंतर ३६ कोटींच्या ठरावावर योग्य ‘वाटा’घाटी झाल्या. सर्व सदस्य आनंदाने ‘रायगड’ या महापौर बंगल्यावरून निघून गेले. त्यानंतर शुक्रवारी सभापती वैद्य यांनी लगेचच २५ सप्टेंबर रोजी स्थायी समितीची बैठक आयोजित केली आहे.
१२५ कोटींचा जॅकपॉट
शहरात ५१ सिमेंट रस्ते करण्यात येणार आहेत. यासाठी १२५ कोटींची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. कंत्राटदारांसोबत दर निश्चित करून लवकरच स्थायी समितीच्या अंतिम मंजुरीसाठी ठराव येणार आहे. स्थायी समितीही या ठरावाची आतुरतेने वाट पाहत आहे. याशिवाय घन कचऱ्याशी संबंधित अनेक कोट्यवधी रुपयांचे ठराव लवकरच मंजुरीसाठी येणार आहेत.