औरंगाबादेत पुन्हा तलवारीचा साठा जप्त, सहा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 05:30 PM2018-10-04T17:30:18+5:302018-10-04T18:08:17+5:30
गुन्हे शाखेने आज पुन्हा सहा जणांकडून १९ तलवारींचा साठा जप्त केल्याने खळबळ माजली आहे.
औरंगाबाद: आॅनलाईन तलवारी मागविणाऱ्यांना तीन महिन्यापूर्वी अटक केल्यानंतर गुन्हेशाखेने आज पुन्हा सहा जणांकडून १९ तलवारींचा साठा जप्त केल्याने खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे या सर्व तलवारी धारदार असून त्या हर्सूल परिसरातील जहाँगिर कॉलनीतून जप्त करण्यात आल्या. याप्रकरणातील तीन आरोपी पसार असून त्यांचा शोध सुरू आहे,अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी गुरूवारी (दि. ४) पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. दिपाली म्हणाल्या की, आलिम खान रहिम खान पठाण (रा. जहांगिर कॉलनी, हर्सूल) याच्या घरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असून तो प्राणघातक शस्त्रे विक्री करीत असल्याची माहिती खबऱ्याने गुन्हेशााखेचे निरीक्षक मधूकर सावंत यांना दिली. त्यानंतर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद , सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख आणि सहायक उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, अफसर शहा, विकास माताडे, विलास वाघ, संजय जाधव, शिवाजी भोसले, ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड आणि संजीवनी शिंदे यांनी आलीमच्या घरावर छापा मारला. तेव्हा त्याच्या घरात दोन धारदार तलवारी मिळाल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्याच कॉलनीत राहणाऱ्या अनेकांना तलवारी विक्री केल्याची कबुली दिली.
त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख मोहसीन शेख मतीन याच्याकडून चार तलवारी तर आरोपी नफीस शहा शरीफ शहाकडून तीन तलवारी जप्त केल्या, इलियास उर्फ इलू इसाक कुरेशीकडून दोन तलवारी, शेख परवेज शेख महेराज , शेख आमेर शेख इकबाल, शेख कलीम उर्फ इलियाज, शेख असर , शेख आवेज शेख मेहराज यांच्या घरातून प्रत्येकी एक अशा एकू ण १९ तलवारी जप्त केल्या.