हायटेक कॉपीच्या प्रकारामुळे पोलीस भरतीसाठी यंत्रणा अलर्ट; १८ लाख युवकांचे भवितव्य ठरणार
By राम शिनगारे | Published: January 9, 2023 04:21 PM2023-01-09T16:21:57+5:302023-01-09T16:22:28+5:30
राज्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या पोलिस भरतीला मुहूर्त लागला आहे.
- राम शिनगारे
औरंगाबाद : राज्यात पोलिस शिपाई, चालक, राज्य राखीव पोलिस दलातील शिपाई पदाच्या १८ हजार ३३१ जागांसाठीची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी १८ लाख १२ हजार ५३८ युवकांनी अर्ज केला आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी कागदपत्रांच्या तपासणीनंतर मैदानी चाचणी घेतली जात आहे. यात पात्र उमेदवारांची लवकरच एकाच वेळी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मागील वेळच्या हायटेक कॉपीच्या प्रकारामुळे महाराष्ट्र पोलिस विभागही अलर्ट झाला आहे. लेखी परीक्षेची तयारी स्थानिक पातळीवर करण्यात येत आहे.
राज्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या पोलिस भरतीला मुहूर्त लागला आहे. पोलिस शिपाई पदाच्या १४ हजार ९५६ जागांसाठी १२ लाख २५ हजार ८९९ अर्ज, चालक पोलिस पदाच्या २ हजार १७४ जागांसाठी २ लाख १५ हजार १३२ अर्ज आणि राज्य राखीव पोलिस दलातील १ हजार २०१ जागांसाठी ३ लाख ७१ हजार ५०७ अर्ज असे एकूण १८ लाख १२ हजार ५३८ उमेदवार पोलिस भरतीसाठी मैदानात उतरले आहेत. २ जानेवारीपासून राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. यात पात्र ठरलेल्यांची लेखी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार असून, राज्यभरात एकाचवेळी ही परीक्षा होणार आहे. मागील पोलिस भरतीच्या वेळी औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतील युवकांनी हायटेक कॉपी करण्याचा प्रयत्न पुणे, नागपूर, आदी ठिकाणच्या लेखी परीक्षेच्या वेळी केला होता. त्याच्या स्मृती पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. त्यामुळे यावेळी असा काही प्रकार घडू नये, यासाठी महाराष्ट्र पोलिस विभागही अलर्ट झाल्याची माहिती पोलिस विभागातील सूत्रांनी दिली.
राज्यस्थानातील घटना व्हायरल
राज्यस्थानमध्ये मागील वर्षी अध्यापक पात्रता परीक्षेत काही तरुणांनी कॉपीसाठी हायटेक तंत्रज्ञान वापरले. चप्पलमध्ये सिमकार्ड, कानात लहान यंत्र बसविले होते. ते ब्ल्यू टूथच्या माध्यमातून कनेक्ट करून बाहेरून प्रश्नांची उत्तरे सांगण्यात येत होती. त्या घटनेचे व्हिडिओ आता व्हायरल झाले आहेत. तसाच प्रकार मागील वेळी पोलिस भरतीमध्ये झाला होता. पुणे, नागपूरसह इतर ठिकाणी झालेल्या भरतीमध्ये हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला होता. यात औरंगाबाद शहरातील पोलिस शिपायांसह जालन्यातील युवकांचा समावेश असल्याचे उघड झाले होते.