लॉकडाऊनसाठी यंत्रणा सतर्क, पाच ठिकाणी तपासणी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:04 AM2021-03-31T04:04:31+5:302021-03-31T04:04:31+5:30
सोयगाव : जिल्ह्यात ३१ मार्च ते ९ एप्रिलदरम्यान कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. सोयगाव तालुका प्रशासनाकडून टास्क फोर्सची बैठक ...
सोयगाव : जिल्ह्यात ३१ मार्च ते ९ एप्रिलदरम्यान कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. सोयगाव तालुका प्रशासनाकडून टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. लॉकडाऊनसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. तालुक्यात पाच ठिकाणी तपासणी केंद्र कार्यान्वित केले जाणार आहे. जोपर्यंत कोरोना चाचणी अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत तालुक्यात प्रवेश बंदी करण्यात येणार आहे, तर परजिल्ह्यात जातानाही कोरोना अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे, असे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सूचना दिल्या.
सोयगाव तालुक्यातून जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा आणि खान्देशकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाच ठिकाणी तपासणी नाके कार्यान्वित करण्यात येतील. यामध्ये सोयगाव तालुक्यांच्या सीमेवर निंभोरा, शेंदुर्णी, फर्दापूर, सोयगाव आणि गोंदेगाव या पाच प्रमुख रस्त्यावर तपासणी नाक्यांचा समावेश आहे. या ठिकाणी १० फिरते निरीक्षक पथक कार्यान्वित करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील लॉकडाऊनचे पालन करण्याबाबत आणि लसीकरण सर्वेक्षणाबाबतची माहिती या निरीक्षकांनी घेऊन तातडीने तहसील कार्यालयाला सादर करावयाची आहे. यामध्ये आशा, अंगणवाडीसेविका, सरपंच, उपसरपंच यांनाही लसीकरणासाठी आवाहन करावयाचा आहे.
टास्क फोर्सच्या बैठकीसाठी गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे, पोलीस निरीक्षक सुदाम सिरसाठ, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोरखनाथ सुरे, नायब तहसीलदार मकसूद शेख, विठ्ठल जाधव आदींची उपस्थिती होती.
५० हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट्य
कोविड लसीकरण गतिमान करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४५ ते ५९ वयोगटांतील आणि ६० पेक्षा जास्त वयोगटांतील सर्वांना लसीकरण करण्यात येत आहे. लोकसंख्येच्या ५० टक्के म्हणजे तब्बल ५० हजार नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सोयगावला प्राप्त झाले आहे. जास्तीतजास्त लसीकरणावर भर दिला जाणार आहे.
छायाचित्र ओळ - सोयगावला बैठकीत मार्गदर्शन करताना तहसीलदार प्रवीण पांडे व इतर.