यंत्रणा ढेपाळली, प्राप्त अर्जांचा ताळमेळ लागेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:09 AM2017-09-23T01:09:39+5:302017-09-23T01:09:39+5:30
जिल्ह्यातील २३० ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य पदासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक विभागाचे काम पाहणारी यंत्रणा ढेपाळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील २३० ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य पदासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक विभागाचे काम पाहणारी यंत्रणा ढेपाळली. कोणत्या तालुक्यात किती अर्ज आॅनलाइन अर्ज प्राप्त झाले, याची आकडेवारी जुळविण्याचे काम शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत सुरूच होते. दरम्यान, शेवटचे वृत्त लिहिपर्यंत भोकरदन तालुक्यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे जालना, भोकरदन, परतूर, अंबड, जाफराबाद, बदनापूर, घनसावंगी येथील तहसील कार्यालयांत सकाळपासून इच्छुकांची गर्दी पाहायला मिळाली. तसेच आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी महा ई-सेवा केंद्र्रांवर तोबा गर्दी उसळली. आॅनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत पुन्हा तहसील कार्यालयात जमा करावी लागत असल्यामुळे तहसीलमध्ये कार्यालयात संबंधित अधिकारी व कर्मचाºयांची दमछाक झाली. जालना तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदासाठी १७९ तर सदस्यपदासाठी ६१५ अर्ज प्राप्त झाले आहेत. मंठा तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाकरिता १३५, तर सदस्यपदाच्या २६१ जागांसाठी ५६८ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक विभागाचे किशोर तायडे यांनी दिली. परतूर तालुक्यात सरपंचपदाच्या ४१ जागांसाठी १९७ तर सदस्यपदासाठी ८९९ अर्ज प्राप्त झाल्याचे तहसीलदार ज्ञानेश्वर फुपाटे यांनी सांगितले. अंबडमधील ३८ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाकरिता एकूण २०७ तर सदस्यपदासाठी ९९२ अर्ज प्राप्त झाले आहेत. बदनापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदासाठी २७ तर सदस्यपदांसाठी १०६ अर्ज प्राप्त झाले आहेत. घनसावंगी व जाफराबाद तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी प्राप्त अर्जांची माहिती उशिरापर्यंत मिळू शकली नाही. दरम्यान, ज्या उमेदवारांनी चिन्हासाठी पसंती क्रमांक दिले नाहीत, त्यांना छाननी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पसंती क्रमांक देता येणार आहेत. ज्या उमेदवार प्रथम येतील त्यांना निवडणूक आयोगाच्या निकषानुसार चिन्ह वाटप करण्यात येईल, असे जालन्याचे तहसीलदार विपिन पाटील यांनी सांगितले.