राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगी अर्जाची टेबलवारी सुरु; विरोधामुळे राजकीय वातावरण तापले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 12:18 PM2022-04-21T12:18:52+5:302022-04-21T12:20:59+5:30
Raj Thackeray: मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले आहे की, कुणाच्याही निवेदनाला आम्ही भीक घालीत नाही. सभेला पोलिसांची परवानगी मिळणार आहे.
औरंगाबाद : राज ठाकरे (Raj Thackeray ) यांच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेच्या परवानगीसाठी जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी केलेल्या अर्जाची टेबलवारी सुरू आहे. परवानगीसाठी अद्याप पोलीस प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. पोलीस आयुक्तालयात दिलेला अर्ज विशेष शाखेमार्फत स्थानिक शाखेकडे जातो. त्यानंतर परवानगीच्या अनुषंगाने सभा ज्या हद्दीत आहे, तेथील पोलीस ठाण्याच्या अभिप्रायासह परवानगी दिली जाते. अर्जाची अशी टेबलवारी असते. सभेला १० दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे परवानगी देण्याबाबत लगेच काही निर्णय होईल, असे चित्र नाही.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी १ मे रोजी सायंंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या नियाेजित सभेच्या अनुषंगाने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची पाहणी केली. या सगळ्या घडामोडींमध्ये सभेला विरोध करणाऱ्या निवेदनांची जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे आवक वाढली आहे. ठाकरेंची सभा आणि वाढता विरोध यामुळे प्रशासनाची कोंडी होत असून, पोलीस प्रशासनाने सभेला अद्याप परवानगी दिलेली नाही. मंगळवारी चार ते पाच संघटनांनी निवेदने देऊन सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडे केली. त्यानंतर बुधवारी अ. भा. सेनेचे महेंद्र साळवे, सतीश म्हस्के यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देऊन सामाजिक शांतता अबाधित राहण्यासाठी सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.
सभेला परवानगी मिळणारच
मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले आहे की, कुणाच्याही निवेदनाला आम्ही भीक घालीत नाही. सभेला पोलिसांची परवानगी मिळणार आहे. सामाजिक शांतताभंग होईल, असा सभेचा उद्देश नसून ही जागरण सभा आहे. सभेला लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. सभेमुळे कुठलाही सामाजिक सलोखा बिघडणार नाही, असा दावा धोत्रे यांनी केला.
सभेला परवानगी दिल्यास रस्त्यावर उतरू
राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेला परवानगी दिल्यास भारिप तथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करील, असा इशारा नेते सुमित भुईगळ यांनी दिला आहे.
शहरातील राजकीय वातावरण तापले
१ मे रोजी औरंगाबादेत सभा घेण्याचे राज ठाकरे यांनी जाहीर करताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. लहान-मोठ्या पक्ष, संघटनांनी सभेबाबत विरोधाचे हत्यार उपसले आहे. पुढील १० दिवसांत आणखी कशा पद्धतीने राजकारण तापेल, हे आत्ताच सांगता येणार नाही. भाजपकडून सभेबाबत अद्याप काही प्रतिक्रिया नाही, तर शिवसेनेने सभेबाबत सोशल वॉर पेटविले आहे. मनसेने मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच काही संघटनांनी सभेला पाठिंबा दिल्याचे पत्रही मनसे नेत्यांना बुधवारी दिले. आगामी काही दिवसांत सभेवरून होर्डिंग्ज वॉर भडकण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.