तडेगाव, नळणी पूर्णा नदी पात्रातून वाळूचा बेसुमार उपसा
By Admin | Published: May 13, 2017 12:32 AM2017-05-13T00:32:40+5:302017-05-13T00:34:18+5:30
केदारखेडा : येथून जवळच असलेल्या भोकरदन तालुक्यातील तडेगाव व नळणी परिसरातील पूर्णा नदीच्या पात्रातून भरदिवसा जेसीबी यंत्राच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
केदारखेडा : येथून जवळच असलेल्या भोकरदन तालुक्यातील तडेगाव व नळणी परिसरातील पूर्णा नदीच्या पात्रातून भरदिवसा जेसीबी यंत्राच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरु आहे. त्यासोबतच त्याची बिनधास्त वाहतूक सुरु आहे़
याकडे प्रशासनाच्या सर्वच कर्मचारी व अधिकाऱ्यांचे जाणून बुजून दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे़ येथील नदीपात्रात शासनाने काही वाळू उपसा करण्यासाठी या वाळू माफियांना परवानगीच दिल्याची जाणीव होऊ लागली आहे़ बेसुमार वाळूचा उपसा होत असल्याने नदीपात्राला धोका निर्माण झाला आले. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी परिसरताील युवकांनी पुढाकार घेतला आहे. नदी पात्रात जेसीबीद्वारे वाळूचा उपसा केल्या जात असताना त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाचे नेमके पाणी कुठे मुरत आहे़ हे सर्वसामान्यांना कळेनासे झाले आहे़ लिलाव घेणाऱ्या गुत्तेदारास सुध्दा जेसीबीद्वारे वाळू उपसा करण्याचा परवाना नसताना अवैध वाळू करणाऱ्या माफियांना ही परवानगी दिली कोणी हा प्रश्न आहे़ प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे हे नदी पात्र बकाल होत आहे़ या नदी पात्राची मोठ्या प्रमाणात चाळणी होत आहे़ तडेगाव व नळणी परिसरातील ट्रॅक्टर सकाळीच नदी पात्रात दाखल होतात़ याद्वारे वाळू नदी काठावर आणल्यानंतर बुलडाणा, सिल्लोड, औरंगाबाद, जालना, भोकरदन आदी भागातून येणाऱ्या ट्रकमध्ये वाळू भरुन वाहतूक केली जाते. काही ट्रक नदीपात्रात थेट जेसीबी यंत्राने भरल्या जात आहेत. यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याचे चित्र आहे़ वाळू माफिया व प्रशासनाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांपर्यंत आर्थिक लागेबांधे असल्याची चर्चा ग्रामस्थांतून होत आहे.