केंद्रीय, कॅबिनेट मंत्रीपद मिळूनही पैठणला 'पूर्णवेळ' तहसीलदार मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 03:08 PM2020-02-04T15:08:46+5:302020-02-04T15:19:48+5:30
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याला गेल्या महिन्याभरापासून पूर्णवेळ तहसीलदार मिळत नसल्याने महसूल विभागातील कामे होत नसल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
औरंगाबाद : रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघाचा भाग असलेल्या पैठण तालुक्याला गेल्या सहा महिन्यापासून पूर्णवेळ तहसीलदार मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तर या सहा महिन्यात आतापर्यंत तीन प्रभारी तहसीलदार बदलले आहे. त्यामुळे पैठणला केंद्रीय आणि कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असले तरीही 'पूर्णवेळ तहसीलदा'र मात्र मिळत नसल्याचे बोलले जात आहे.
ग्रामीण प्रशासनाचा कणा म्हणून तहसील कार्यालयाची ओळख आहे. शेतकऱ्यांसाठी तर तहसील कार्यालयच मिनी मंत्रालय. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याला गेल्या सहा महिन्यापासून पूर्णवेळ तहसीलदार मिळत नसल्याने महसूल विभागातील कामे होत नसल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे याच पैठणला आमदार भुमरे यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे, तर पैठण तालुका हा दानवे यांच्या जालना लोकसभा मतदारसंघात येते.
महिनाभरापूर्वी तत्कालीन तहसीलदार महेश सावंत यांच्यावर लाच मागीतेल्याच्या आरोपाखाली कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे निवडणुकीच्या काळात पैठणच्या प्रभारी तहसीलदार पदाची जवाबदारी राजाभाऊ कदम यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र निवडणुका होताच त्यांनी पदभार सोडला. त्यामुळे त्यांच्या जागी दत्ता भारस्कर यांच्यावर जवाबदारी देण्यात आली होती. मात्र तेही दीड महिन्यापेक्षा जास्त काळ राहू शकले नाहीत. त्यांनतर आता आर.के. मेंडके यांची पैठणच्या प्रभारी तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्णवेळ तहसीलदार देण्याची मागणी पैठणकरांनी केली आहे.