करोडीतील अतिक्रमणाची तहसीलदारांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:14 PM2019-07-27T23:14:55+5:302019-07-27T23:15:13+5:30
करोडी येथील गायरान जमिनीवर सुरु असलेल्या अतिक्रमणाचा शनिवारी महसूल विभागाने आढावा घेतला.
वाळूज महानगर : करोडी येथील गायरान जमिनीवर सुरु असलेल्या अतिक्रमणाचा शनिवारी महसूल विभागाने आढावा घेतला. या प्रसंगी तहसीलदार रमेश मुनलोड यांनी अतिक्रमणधारकांना तात्काळ अतिक्रमणे काढुन घ्या, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.
येथील साजापूर-करोडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील करोडी येथील गायरान जमिन गट क्रमांक २४ मध्ये गत चार-पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी अतिक्रमणे केली आहेत.
या शासकीय गटनंबरमधील काही जमिन आरटीओ विभाग, रस्ते विकास महामंडळ, महावितरण आदी शासकीय कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत. शासनाकडून बेघर असलेल्या नागरिकांना घरे बांधण्यासाठी भुखंड वाटप केली जात असल्याची अफवा काहींनी पसरविल्यामुळे या ठिकाणी अनेकांनी अतिक्रमणे केली आहेत.
या पार्श्वभूमीवर शनिवारी तहसीलदार रमेश मुनलोड, मंडळ अधिकारी एल.के.गाडेकर, तलाठी आदींनी करोडी परिसरात भेट देऊन पाहणी केली. पोलीस बंदोबस्त मिळताच या सरकारी जागेवरील अतिक्रमणे निष्कासित केले जाईल, असे मुनलोड यांनी सांगितले.