कर्मचा-यांचे तहसीलदारांच्या विरोधातच आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 03:29 PM2017-08-03T15:29:40+5:302017-08-03T15:34:27+5:30
तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्या कार्यपद्धतीने होणा-या त्रासा विरोधात मानवत तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी एकवटले आहेत. सामूहिक रजा देत सर्व कर्माचा-यांनी त्यांच्या बदलीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
मानवत (जि. परभणी ), दि. ३ : तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्या कार्यपद्धतीने होणा-या त्रासा विरोधात मानवत तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी एकवटले आहेत. सामूहिक रजा देत सर्व कर्माचा-यांनी त्यांच्या बदलीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या कर्मचा-यांनी सकाळपासूनच तहसील कार्यालयासमोर तंबू टाकत ठीया मांडला आहे.
मानवत येथील तहसीलदार बालाजी शेवाळे गतवर्षी येथे रुजू झाले आहेत. सुरवातीच्या काही दिवसातच कर्मचारी आणि त्यांच्यात प्रचंड बेबनाव सुरू झाला. कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देणे, वरिष्ठांना चुकीचा अहवाल पाठविण्याची धमकी देणे, नोटिसा बजावणे स्वरूपाच्या तक्रारी कर्मचाऱ्याकडून जिल्हाधिकारी यांनी करण्यात आल्या होत्या.
६ जुन रोजी याच कर्मचा-यांनी तहसीलदार शेवाळे यांच्या त्रासाला कंटाळून जिल्हाधिका-यां कडे सामूहिक रजा पाठवून दिल्या होत्या. मात्र, त्या वेळी वरिष्ठ अधिका-यांकडून कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यात आली होती. यानंतर उपजिल्हाधिकारी सि. एस. कोकणी यांनी कर्मचा-यांचे जवाब नोंदवून त्याचा अहवाल जिल्हाधिका-यांकडे पाठवला होता. याचा काही परिणाम न होता शेवाळे यांच्याकडून कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरूच राहिला. यावर बुधवारी (दि.२ ) सर्व कर्मचाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट या प्रकरणी भेट घेतली. यावेळी त्यांनी एक दिवस थांबा असे सांगितले परंतु शेवाळे यांच्यावर कारवाई झाली नाही. यामुळे आज तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, मंडळ अधिकारी व तलाठी अशी २७ कर्मचारी सामूहिक रजेवर गेले. अधिकाऱ्यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी किंवा नागरिकांची आंदोलन होतात. अधिकारी विरुद्ध कर्मचारी अशा विरळच होणा-या आंदोलनाने मात्र नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
तहसील ओस, काम ठप्प
सामूहिक आंदोलन सुरू झाल्याने तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे.कर्मचारी नसल्याने कार्यालयाकडे कोणीच फिरकले नाही. यामुळे कार्यालय ओस पडले आहे.
वकील संघाचा पाठिंबा
सामूहिक रजा आंदोलन स्थळी वकील संघाच्या पदाधिकारी यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला , तसा ठरावच वकील संघाने घेतला आहे.
चर्चा सुरू आहे
हे आंदोलन कशा मुळे पेटले समजत नाही. चूक असेल तर माघार घ्यायला तयार आहे. आपण कोणत्याही कर्मचाऱ्यांवर आरोप करू इच्छित नाही, त्याच्या सोबत चर्चा सुरु आहे- बालाजी शेवाळे, तहसीलदार