ताई, या डॉक्टरांवर तुझा भरोसा नाही का? प्राथमिक आरोग्य केंद्रांतील प्रसूतीचे प्रमाण नगण्य
By विजय सरवदे | Published: November 3, 2023 04:27 PM2023-11-03T16:27:52+5:302023-11-03T16:28:47+5:30
मागील सहा महिन्यांत आरोग्य केंद्रांतील प्रसूतीचे प्रमाण सरासरी ५ टक्के एवढे आहे.
छत्रपती संभाजीनगर : बालमृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक गरोदर मातेची प्रसूती हॉस्पिटलमध्येच व्हावी, असा आग्रह महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचा आहे, तर दुसरीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांत किमान २५ टक्के तरी प्रसूती व्हाव्यात, असे निर्देश जिल्हा आरोग्य विभागाला दिले आहेत. दरम्यान, अपुरे मनुष्यबळ व अन्य कारणांन्वये आरोग्य केंद्रांतील प्रसूतींचे प्रमाण मागील सहा महिन्यांत सरासरी ५ टक्के एवढ्यावरच थांबले आहे.
जिल्ह्यात ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे व २७९ उपकेंद्रे आरोग्य सेवा देतात. या आरोग्य केंद्रांत मागील सहा महिन्यांत नियमित तपासणीसाठी येणाऱ्या ४४ हजार ३५८ गरोदर मातांपैकी २ हजार २८१ प्रसूती झाल्या आहेत. मग, उर्वरित गरोदर महिलांची प्रसूती घरी झाली की खासगी रुग्णालयात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी स्पष्ट केले की, नियमित तपासणीसाठी येणाऱ्या सर्वच गरोदर मातांची प्रसूती आरोग्य केंद्रांमध्येच व्हावी, हे अपेक्षित नाही. याच्या अनेक कारणांपैकी आरोग्य केंद्रांत प्रशिक्षित परिचारिकांची मोठी कमतरता आहे. पहिली प्रसूती असेल तर शक्यतो अशा महिलांना सरकारी रुग्णालयांकडे रेफर केले जाते. सीझर प्रसूतीचा इतिहास असलेल्या महिलांना सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सहजपणे रक्ताची उपलब्धता असणाऱ्या हॉस्पिटलकडे रेफर केले जाते. थोड्याफार कार्यरत असलेल्या परिचारिकांकडे दैनंदिन ओपीडीशिवाय मिशन इंद्रधनुष्य, आयुष्मान भव उपक्रमांतर्गत तपासणी, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढणे, १८ वर्षे वयापुढील व त्याखालील मुलांची तपासणी या कामांचा भार आहे. यामुळे आरोग्य केंद्रांतील प्रसूतीचे प्रमाण कमी वाटते.
कोणत्या तालुक्यात किती प्रा. आरोग्य केंद्र?
तालुका- प्रा. आरोग्य केंद्र- गरोदर महिला- आरोग्य केंद्रातील प्रसूती
छत्रपती संभाजीनगर - ६- ८०६६- १६८
फुलंब्री - ५- २९५०- १४६
सिल्लोड- ६- ५७९७- ६०७
सोयगाव- ३- २१४५- ४५
कन्नड- ९- ५९३२- ५७५
खुलताबाद- ३- १९६९- १०९
गंगापूर- ६- ६७५६- १५८
वैजापूर- ६- ४८५१- २९७
पैठण- ७- ५८९३- १६६
प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ ५ टक्के प्रसूती
मागील सहा महिन्यांत आरोग्य केंद्रांतील प्रसूतीचे प्रमाण सरासरी ५ टक्के एवढे आहे.
कारणे दोनच
जिल्हा रुग्णालयाकडे रेफर : पहिली प्रसूती असेल किंवा सीझर झालेले असेल, तर अशा महिलांना सरकारी रुग्णालयांकडे रेफर केले जाते.
खासगी रुग्णालयात १०२ क्रमांची रुग्णवाहिका मोफत सेवा देत असल्यामुळे बहुतांश कुटुंबे शहरातील खासगी रुग्णालयात प्रसूती पसंत करतात.
जिल्हा आरोग्य अधिकारी कोट
आरोग्य केंद्रांमध्येच प्रसूती व्हावी, यासाठी आमचा आटोकाट प्रयत्न असतो. अपरिहार्य कारणास्तव गरोदर मातांना जिल्हा रुग्णालय अथवा घाटी हॉस्पिटलकडे संदर्भित केले जाते. सुरक्षित प्रसूतीसाठी ग्रामीण भागातील गरोदर मातांनी आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी प्राधान्य द्यावे.
- डॉ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी.