ताई, मी सकाळी सहावाजेपर्यंत काम करतो; मुख्यमंत्री शिंदेंचे सुप्रिया सुळेंना जोरदार प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 06:28 PM2022-09-12T18:28:12+5:302022-09-12T18:29:06+5:30
कोणी निंदा, कोणी वंदा विरोधकांचा टीका करणेच धंदा आहे.
औरंगाबाद: अजित पवार सकाळी सहा वाजेपासून काम करतात, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आधी अजित दादा टीका करत आता सुप्रिया ताई सुद्धा टीका करत आहेत. त्यांना माझे सांगणे आहे, ताई मी सकाळी सहावाजेपर्यंत काम करतो, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ते पैठण येथे सभेदरम्यान मार्गदर्शन करत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आज मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे यांची सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. प्रामुख्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणा दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, आधी अजित पवार टीका करायचे आता सुप्रिया सुळेही करत आहेत. ताई म्हणाल्या, अजितदादा सकाळी सहा वाजेपासून काम सुरु करतात. पण ताई, मी सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतो. कोणी निंदा, कोणी वंदा विरोधकांचा टीका करणेच धंदा आहे. पण या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
काल दिल्लीत काय झाले?
राष्ट्रवादीतील नाराजी नाट्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी निशाना साधला. काल दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात जयंत पाटील यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना बोलू दिले नाही. जयंत पाटील यांना विरोधी पक्ष नेता व्हायचे होते पण इथे अजित पवारांची दादागिरी चालली. तर दिल्लीत जयंत पाटील यांनी दादांचे चालू दिले नाही, अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.