"आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव विधिमंडळात घ्या अन् लोकसभेत पाठवा, आम्ही पाठिंबा देतो"

By बापू सोळुंके | Published: July 7, 2024 07:34 PM2024-07-07T19:34:06+5:302024-07-07T19:36:02+5:30

उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला फॉर्म्युला.

Take a resolution in the Legislature to increase the reservation limit and send it to the Lok Sabha Uddhav Thackeray gave the formula | "आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव विधिमंडळात घ्या अन् लोकसभेत पाठवा, आम्ही पाठिंबा देतो"

"आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव विधिमंडळात घ्या अन् लोकसभेत पाठवा, आम्ही पाठिंबा देतो"

छत्रपती संभाजीनगर : ‘मराठा आणि ओबीसी समाज आरक्षणावरून एकमेकांच्या विरोधात उभे आहेत, अशा परिस्थितीत आरक्षणाची मर्यादा वाढविणे हाच एकमेव पर्याय आहे. आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा ठराव विधिमंडळात घ्या आणि लोकसभेत पाठवा. दोन्ही ठिकाणी आम्ही पाठिंबा देतो,’ अशा शब्दात उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारला पर्याय दिला.

बीड बायपासवर रविवारी उद्धवसेनेचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, शिवसेना सरचिटणीस विनायक राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, मिलिंद नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यासाठी उद्धवसेनेच्या जिल्ह्यातील प्रमुख, पदाधिकाऱ्यांपासून ते गटप्रमुखांपर्यंत, कार्यकर्ते, शिवसेनेचे सरपंच आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी ठाकरे म्हणाले की, ‘मी येथे आरक्षणावर बोलणार आहे. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. कृपा करून आपसात भांडू नका, असे आवाहन करत मराठा, धनगर, ओबीसी आणि मुस्लिम या सर्व जातींच्या न्याय्य मागण्या सोडविण्यासाठी शिवसेना तुमच्यासोबत आहे. आपसात भांडून, घरे जाळून न्याय मिळणार नाही, तर एकत्र येऊन महाराष्ट्राला ताकद दाखवून द्या,’ असे आवाहन त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजाला केले.

जरांगे पाटील आणि हाके हे उपोषण करून स्वत:च्या जिवाशी खेळत असतात. यामुळे जरांगे आणि हाके यांच्यासह दोन्ही समाजातील प्रतिष्ठित लोकांना बोलवा आणि तोडगा काढा, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले. ५२ टक्के आरक्षणाची मर्यादा ठरलेली आहे. मर्यादेबाहेर यापूर्वी दिलेले आरक्षण टिकले नाही. बिहार राज्यातील आरक्षणही असेच उडाले आहे. यामुळे सर्व समाजाला सामावून घेण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढविणे केंद्र सरकारच्या हातात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा ठराव विधिमंडळात घ्यावा आणि लोकसभेत पाठवावा. आम्ही तुम्हाला दोन्ही ठिकाणी पाठिंबा देतो, अशी ग्वाही देत ठाकरे यांनी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा पर्याय सुचवला.

Web Title: Take a resolution in the Legislature to increase the reservation limit and send it to the Lok Sabha Uddhav Thackeray gave the formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.