साठेबाजांवर कारवाई करा
By Admin | Published: May 24, 2016 11:54 PM2016-05-24T23:54:04+5:302016-05-25T00:02:13+5:30
औरंगाबाद : विभागातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळून निघत आहे. या परिस्थितीत त्याची अजिबात लूट होता कामा नये. म्हणून पुरेसी काळजी घ्या
औरंगाबाद : विभागातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळून निघत आहे. या परिस्थितीत त्याची अजिबात लूट होता कामा नये. म्हणून पुरेसी काळजी घ्या, खते-बियाणांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर आणि साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशा स्पष्ट सूचना राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी आज येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. एखादा अधिकारी कुणाला पाठीशी घालत असेल तर त्यालाही कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी
दिला.
राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारी मराठवाडा विभागाची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. यामध्ये त्यांनी बियाणे आणि खतांची मागणी, उपलब्धता, भरारी पथकांची कारवाई आदींचा जिल्हावार आढावा घेतला. काही जिल्ह्यांचा आढावा सुरू असताना त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. शिवाय नियोजनाचा अभावही दिसून आला. या कारणावरून देशमुख यांनी अनेक अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले की, खरीप हंगामाच्या दृष्टीने मराठवाड्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. सर्वच जिल्ह्यांत खते आणि बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. कुठेही बियाणे किंवा खतांचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. सोयाबीनच्या बियाणाचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. परंतु आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्याकडील सोयाबीनचीच पेरणी करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होऊन पिकांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यादृष्टीनेही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे.
यंदा पुरेसा पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे. तरीदेखील खबरदारी म्हणून आपत्कालीन नियोजन केले आहे. पावसाचा खंड पडला तर काय करावे, दुबार पेरणीची गरज भासली तर कोणत्या गोष्टी करायच्या याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्यासाठी कृषी विभागाने जिल्हानिहाय आराखडे तयार केले आहेत, असेही देशमुख म्हणाले.
बैठकीला औरंगाबाद प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, विभागीय गुणनियंत्रण अधिकारी भीमराव कुलकर्णी यांच्यासह आठही जिल्ह्यांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा परिषदांचे जिल्हा कृषी अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक आदी अधिकारी हजर होते.