शेतकरी विरोधातील गुन्हे मागे घ्या
By Admin | Published: June 5, 2017 12:51 AM2017-06-05T00:51:45+5:302017-06-05T00:51:55+5:30
शेतकऱ्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी सेनेने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील शेतकरी सनदशीरमार्गाने आंदोलन करीत असताना पोलीस प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
शनिवारी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन् यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, एक जूनपासून शेतकरी संपावर गेले असून, या संपाची पूर्वसूचनादेखील सरकारला शेतकऱ्यांनी दिली होती. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा संप आहे, परंतु काही समाजकंटकांनी या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी संपाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून सामान्य शेतकऱ्यांवर अत्यंत अन्यायकारक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांचा याच्याशी संबंध नाही अशांवर दरोडे व प्राणघातक हल्ले यांसारखे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार लोकशाहीला घातक आहे. गरीब शेतकऱ्यांवर या प्रकारे सरकार व पोलिसांकडून होत असलेला हा अमानुष प्रकार त्वरित थांबविण्यात यावा, शेतकऱ्यांवरील सर्व गुन्हे रद्द करावेत व त्यांना सोडविण्यात यावे अन्यथा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भाऊलाल तांबडे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विलास शिंदे, राजू लवटे, डी. जी. सूर्यवंशी, गोकुळ पिंगळे, झुंजारराव देशमुख, अरुण काळे, राहुल दराडे, उमेश चव्हाण आदी उपस्थित होते.