किडनीला जपा, नाही तर दाता शोधून ठेवा ! मराठवाड्यात ३०० जणांना हवी किडनी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 11:28 AM2022-03-10T11:28:55+5:302022-03-10T11:30:31+5:30
जागतिक मूत्रपिंड दिन: औरंगाबादेत महिन्याला चार हजार डायलिसिस; मराठवाड्यात ३०० जणांना हवी किडनी
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : मूत्रपिंड (किडनी) हा मानवी शरीरातील एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. ही किडनी खराब झाली तर काय यातना होतात, हे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीयच सांगू शकतात. औरंगाबादेत महिन्याला चार हजार रुग्णांचे डायलिसिस होतात. मराठवाड्यात ३०० रुग्ण किडनी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
जागतिक मूत्रपिंड दिवस हा जगभर मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. वैद्यकीय तज्ज्ञ किडनीची तुलना सुपर काॅम्प्युटरशी करतात. कारण किडनीची रचना खूप अनोखी आणि कार्य गुंतागुंतीचे आहे. किडनी शरीरातील रक्त साफ करून मूत्राची निर्मिती करते. शरीरातील पाणी, आम्ल, क्षार, अन्य घटक आणि शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या पदार्थांचे संतुलन बिघडले तर धोकादायक ठरू शकते. डायलिसिस करणाऱ्या क्राॅनिक किडनी फेल्युअरच्या ४० टक्के रुग्णांची किडनी खराब होण्याचे कारण मधुमेह असतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
किडनी निरोगी राहण्यासाठी...
-रोज तीन लिटरहून अधिक (१० ते १२ ग्लास) पाणी प्यावे.
- नियमित व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवणे.
- ४० वर्षांनंतर जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवणे.
-धूम्रपान, तंबाखू, गुटखा आणि मद्याचे व्यसन टाळावे.
- डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय अनावश्यक औषधी घेऊ नयेत.
- मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने वयाच्या २० वर्षांनंतर आरोग्य तपासणी करणे.
- वयाच्या चाळिशीनंतर कोणताही त्रास नसला तरी नियमितपणे आरोग्य तपासणी करणे.
दररोज एकावर प्रत्यारोपण
मधुमेह, उच्च रक्तदाब, अतिस्थूल अशा अनेक कारणांनी किडनी विकाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या आजारांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. दररोज एकावर किडनी प्रत्यारोपणाची वेळ येत आहे. मराठवाड्यात तीनशे रुग्णांना किडनी मिळण्याची प्रतीक्षा आहे.
- डाॅ. सुधीर कुलकर्णी, विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती
...तर धोका टाळणे शक्य
भारतासह जगभरात किडनी फेल्युअरचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणाबाहेरील शुगर आहे. त्यामुळे जर शुगर नियंत्रणात ठेवली तर किडनी फेल्युअरचा धोका टाळणे शक्य आहे.
- डाॅ. नीलेश लोमटे, मधुमेह आणि आंतरग्रंथी तज्ज्ञ
वेळीच उपचार करावेत
किडनीचे अनेक आजार खूप गंभीर असतात. त्यावर योग्य वेळी उपचार केले नाहीत तर काहीच फायदा होत नाही. डायलिसिस, किडनी प्रत्यारोपणासारखे उपचार प्रचंड महाग आहेत. त्यामुळे आरोग्याकडे, आजारांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.
- डाॅ. वाजेद मोगल, किडनी विकारतज्ज्ञ