तरुणांनो आरोग्य सांभाळा; तपासणी केली अन् झाले आजाराचे निदान, काहींवर सर्जरीचीही वेळ
By संतोष हिरेमठ | Published: November 1, 2023 07:07 PM2023-11-01T19:07:38+5:302023-11-01T19:08:09+5:30
राज्यात आरोग्य विभागांतर्गत आयुष्मान भव: मोहिमेंतर्गत झाली तपासणी; कुणाला उच्चरक्तदाब, कुणाला मधुमेह, हर्निया, पोटाचे विकार
छत्रपती संभाजीनगर : रुग्णालयात जाईपर्यंत अनेक तरुणांना आपल्याला काही आजार असेल, याची कल्पनाही नव्हती. मात्र, मोफत तपासणी केली आणि काहींना उच्चरक्तदाब, तर काहींना मधुमेह तर काहींना इतर आजारांचे निदान. ‘आयुष्यमान भव’ अभियानात १८ वर्षांवरील तरुणांची मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे. यातून ही बाब पुढे आली आहे.
राज्यात आरोग्य विभागांतर्गत आयुष्मान भव: मोहिमेंतर्गत १७ सप्टेंबरपासून ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे- वैभव महाराष्ट्राचे’ अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये १८ वर्षे व त्यावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत १८ वर्षांखाली ३७ हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यात तब्बल १५ हजार जणांवर औषधोपचार करण्यात आले, तर काहींवर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरसह हिंगोली, जालना, परभणी जिल्ह्यातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. आरोग्य उपसंचालक डाॅ. भूषणकुमार रामटेके म्हणाले, हे अभियान ३१ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रापासून, तर जिल्हा रुग्णालयांपर्यंत सर्व ठिकाणी तपासणी केली जात आहे.
या तपासण्या आणि उपचार
आरोग्य विभागांतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये १८ वर्षांवरील तरुणांची रक्तदाब, मधुमेह, हर्निया, पोटाचे विकार, एचआयव्ही, तोंडाचा कर्करोग, मनोविकारासह इ. तपासण्या केल्या जात आहेत. ज्यांना शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, अशांना शासकीय रुग्णालयासह शासकीय योजना लागू असलेल्या खाजगी रुग्णालयात संदर्भित केले जाते. एकट्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत ५०१ जणांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान झाले.
चार जिल्ह्यांतील तपासणीची स्थिती
जिल्हा- तपासणी झालेले १८ वर्षांवरील पुरुष- वैद्यकीय चाचण्या- औषधोपचार- शस्त्रक्रिया
छत्रपती संभाजीनगर- ३७,००३--३०,०६७--१५,०२०--५०१
हिंगोली-२७,५१५--२४,६२१--३,६८०--८८
जालना-२०,८९८--१७,८१८--८,२४३--७३
परभणी-४३,४४६--३६,९१२--७,५२५--५०