'चटणी-भाकरी सोबत घ्या', २० जानेवारीला समाज बांधवांसह जरांगे पाटील मुंबईकडे पायी निघणार
By बापू सोळुंके | Published: December 26, 2023 05:19 PM2023-12-26T17:19:40+5:302023-12-26T17:20:57+5:30
सुमारे दहा लाख वाहनांतून समाज बांधव सोबत चटणी, भाकर घेऊन सहभागी होतील
छत्रपती संभाजीनगर: मराठा समाज कुणबी असल्याच्या एवढ्या मोठ्या नोंदी सापडल्या आहेत, आता या नोंदीचा आधार घेऊन राज्यसरकारने मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिले पाहिजे, आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे, यासाठी मी २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईला पायी निघणार असल्याचे मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले. दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जरांगे पाटील यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत चर्चा केली.
शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले जरांगे पाटील यांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सरकारणे सांगितलं कायदा पारित करायला वेळ द्या, आम्ही नोंदी कायदा पारित करायला ४० दिवस दिले. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे. अनेकदा सरकारला स्पष्टपणे सांगितले आहे. यादीत क्रमांक ८३ ला तत्सम मराठा म्हणून उल्लेख आहे. परंतु सरकारकडून जाणून बुजून चालढकल करायचं काम सुरू असल्याचे दिसते. केवळ राजकीय इच्छाशक्ती अभावी आम्हाला आजपर्यंत आरक्षण दिले नाही. सर्वोच्च न्यायालयातून जुने आरक्षण मिळाले तरी ते आम्ही घेणारच आहोत. कारण ते आरक्षण आंदोलनातूनच मराठा समाजाला मिळाले होते.
आमच्यावर कोयते, कुऱ्हाडी काढणारे संस्कृती काय संस्कृती शिकवता
ओबीसी नेते तथा राज्याचे नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव घेता जरांगे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका आमच्यावर कोयते ,कुऱ्हाडी काढण्याची भाषा करणारे मला संस्कृतीची भाषा काय शिकवणार? असा सवाल केला. धनगर समाजाच्या आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा म्हटल्यांवर कागद खाईल हा माणूस असेही जरांगे म्हणाले.
मीठ, मिरची सोबत घेऊन आपआपल्या वाहनांनी मुंबईला जायचे
२० जानेवारी रोजी मुंबईला निघायचे आहे. मुंबईला निघताना प्रत्येक गावकऱ्यांनी स्वत:च्या जेवणाची व्यवस्था करावी, यासाठी मीठ, मिरची सोबत घ्यावी,असे आवाहन जरांगे पाटील यांनी समाजाला केले.
शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी घेतली भेट
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी सुमारे अर्धा तास जरांगे पाटील यांच्याशी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि मराठा आरक्षणावर चर्चा केली.