कोरानाग्रस्ताला मृत्यूच्या दारात नेण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:02 AM2021-04-28T04:02:12+5:302021-04-28T04:02:12+5:30
उच्चरक्तदाब आणि मधुमेह सर्वांत पुढे डेथ ऑडिट : आजारांमुळे उपचारास अल्पप्रतिसाद, ५० वर्षांवरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक औरंगाबाद : ...
उच्चरक्तदाब आणि मधुमेह सर्वांत पुढे
डेथ ऑडिट : आजारांमुळे उपचारास अल्पप्रतिसाद, ५० वर्षांवरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक
औरंगाबाद : जिल्ह्यात रोज होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूने चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु रुग्णांच्या मृत्यूला फक्त कोरोनाच कारणीभूत नाही, तर कोरोनासह इतर आजारांमुळे रुग्णांची प्रकृती गंभीर होते आणि मृत्यू ओढावत आहे. कोरानाग्रस्ताला मृत्यूच्या दारात नेण्यात उच्चरक्तदाब पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर मधुमेह आहे. त्यामुळे हे आजार नियंत्रित ठेवण्यासह कोरोनाची लक्षणे दिसल्यावर वेळीच उपचार घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
वयाच्या ५०नंतर आणि वृद्धापकाळात अनेक आजारांना सामोरे जावे लागते. उच्चरक्तदाब, मधुमेह यासह अशा आजारांमुळे कोरोना रुग्णांची प्रकृती गंभीर होते. एकाच वेळी अनेक आजारामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने मृत्यू ओढवत असल्याची परिस्थिती दिसून आली. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांमध्ये ५१ ते ८० या वयोगटांतील रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. कोरोनाबाधितांत मधुमेह, उच्चरक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. औरंगाबादेत कोरोनामुळे ५ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला होता. बळींची संख्या आजघडीला २ हजार ४०१ वर गेली आहे. जिल्ह्यात दररोज एक ते दीड हजार रुग्णांचे निदान होत आहे. या सगळ्यांत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. ५१ वर्षांवरील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असून, बहुतांश मृतांना कोरोनासह अन्य आजारही असल्याचे समोर आलेले आहे. यात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, किडनी विकार आणि अन्य या आजारांचे प्रमाण अधिक आहे. एकाच वेळी अनेक आजारामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मृत्यूचा धोका वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
-------
१५ मार्च ते १५ एप्रिलदरम्यान एकूण मृत्यू-१,४४१
कोरोनामुळे मृत्यू-४५०
इतर कारणांनी मृत्यू-९९१
------
अतिजोखमीच्या व्यक्तींनी काय करावे?
मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार नियंत्रित ठेवले पाहिजे. त्याची औषधी वेळेवर आणि नियमित घेतली पाहिजे. विनाकारण चिंता करू नये. सकारात्मक राहिले पाहिजे. आजार, लक्षणे अंगावर काढू नये. वेळीच उपचार घेतले पाहिजे. कोरोनाचा संसर्ग किती प्रमाणात झाला आणि रुग्णाची प्रतिकारशक्ती यावर सर्व अवलंबून असते. कमी वयात मृत्यूचे प्रमाण सध्या तरी कमी आहे.
- डाॅ. अनिल जाेशी, अध्यक्ष, डेथ ऑडिट कमिटी, घाटी