‘दंड घ्या; पण नियम तोडू द्या’ या मानसिकतेने औरंगाबाद वाहतूक पोलीस त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 01:05 PM2017-12-23T13:05:01+5:302017-12-23T13:05:06+5:30
शहरातील प्रत्येक रस्त्यावर बेशिस्त वाहनचालकांना रोखण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात असतात. या पोलिसांना चकमा देत रोज शेकडो वाहनचालक सिग्नल तोडून पळताना नजरेस पडतात. याशिवाय अवैध प्रवासी वाहतूक, विना हेल्मेट, विना लायसन्स, ट्रिपलसीट दुचाकी चालविणे, यासह अन्य वाहतूक नियम तोडून वाहने पळविणार्या तब्बल पावणेदोन लाख वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहतुकीच्या केसेस केल्याचे समोर आले. जानेवारी ते कालपर्यंत झालेल्या या कारवाईत सव्वाचार लाख रुपये दंड वसूल झाला.
- बापू सोळुंके
औरंगाबाद : शहरातील प्रत्येक रस्त्यावर बेशिस्त वाहनचालकांना रोखण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात असतात. या पोलिसांना चकमा देत रोज शेकडो वाहनचालक सिग्नल तोडून पळताना नजरेस पडतात. याशिवाय अवैध प्रवासी वाहतूक, विना हेल्मेट, विना लायसन्स, ट्रिपलसीट दुचाकी चालविणे, यासह अन्य वाहतूक नियम तोडून वाहने पळविणार्या तब्बल पावणेदोन लाख वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहतुकीच्या केसेस केल्याचे समोर आले. जानेवारी ते कालपर्यंत झालेल्या या कारवाईत सव्वाचार लाख रुपये दंड वसूल झाला.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, औरंगाबाद शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबतच शहरात ६ लाखांहून अधिक दुचाकी, तर २५ हजार आॅटो रिक्षा, ३५ हजार कार, स्कूल बस, खाजगी बसेस, टॅक्टर, ट्रक, मिनी टेम्पो, रुग्णवाहिका यांचा समावेश आहे. यासोबतच दरवर्षी ४० ते ५० हजार नवीन दुचाकींची भर पडते. वाढत्या वाहनांसोबतच वाहनचालकांची संख्याही वाढत आहे. नियम मोडून वाहने पळविणार्या चालकांवर कारवाई करण्यासाठी शहरात स्वतंत्र वाहतूक विभाग आहे. सहायक पोलीस आयुक्त सी.डी. शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे, पोलीस निरीक्षक एच.एम. गिरमे, पोलीस निरीक्षक मनोज पगारे, १५ पोलीस उपनिरीक्षक आणि तब्बल अडीचशे कर्मचारी शहराचे वाहतूक नियमन करीत असतात. विविध चौक आणि
रस्त्यावर ३८ वाहतूक सिग्नल आहेत.
प्रत्येक सिग्नलवर वाहतूक पोलीस असतात. वाहतूक पोलीस कर्तव्यात व्यग्र असल्याचे दिसताच बेशिस्त वाहनचालक सिग्नल तोडून सुसाट पुढे जातात. यामुळे प्राणांतिक अपघात होण्याचा धोका अधिक असतो. विना हेल्मेट, विचित्र नंबर प्लेट, विना नंबर, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करणे, यासह अन्य विविध मोटार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलीस केसेस करीत असतात. जानेवारी ते गतसप्ताहापर्यंत शहर पोलिसांनी पावणेदोन लाख वाहनचालकांवर बेशिस्तीच्या केसेस करून त्यांच्याकडून तब्बल सव्वाचार कोटी रुपये दंड वसूल केला. वाहतूक पोलिसांकडून होणार्या कारवाईनंतरही वाहनचालक वाहतूक नियम मोडणे सोडत नाहीत. परिणामी रोज वाहतूक नियम मोडणार्या वाहनचालकांची संख्या वाढतच असते, अशी माहिती सहायक आयुक्त शेवगण यांनी दिली.
आॅनलाईन दंडाच्या नोटिसा
विविध चौकातील सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे फोटो कॉपी काढून बेशिस्त वाहनचालकांना घरपोच पावत्या देण्यात येतात. यावर्षी सुमारे १० हजार वाहनचालकांना घरपोच नोटिसा देऊन दंड वसूल करण्यात आला.
ग्रामीण पोलिसांनी पकडले २४ हजार वाहनचालक
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत २४ हजार ५७५ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ५७ लाख ८४ हजार ७०७ रुपये दंड वसूल केला. विशेष म्हणजे गतवर्षी ३३ हजार ३८० वाहनचालकांवर वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी कारवाई करून त्यांच्याकडून ९७ लाख ३५ हजार ८२९ रुपये दंड वसूल करण्यात आला होता.