घेण्या गगनभरारी; औरंगाबादी पतंगाला हवी उभारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 01:11 PM2019-12-05T13:11:10+5:302019-12-05T13:14:14+5:30

राष्ट्रीय पतंग महोत्सव भरविण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधींनी घ्यावा पुढाकार 

To take the plunge; Aurangabad kite wants attention | घेण्या गगनभरारी; औरंगाबादी पतंगाला हवी उभारी 

घेण्या गगनभरारी; औरंगाबादी पतंगाला हवी उभारी 

googlenewsNext
ठळक मुद्देवर्षभरात ५० लाख पतंगांची होते निर्मिती  कमी हवेतही उडण्याची औरंगाबादी पतंगात क्षमता

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : पर्यटनाच्या राजधानीत १५० ते २०० पारंपरिक कारागीर वर्षभरात सुमारे ५० लाख पतंग तयार करतात. कमी हवेतही उडण्याची क्षमता या औरंगाबादी पतंगांमध्ये असल्याने येथील पतंगाला निजामाबादपर्यंत मागणी आहे. मात्र,औरंगाबादी पतंगांचा ब्रँड निर्माण होऊ शकला नाही. यामुळे येथील पतंग कारागीर अजूनही दारिद्र्यातच जीवन जगत आहेत. येथील पतंगाचा ब्रँड तयार होण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील पतंग महोत्सवाचे आयोजन करावे, अशी मागणी पतंगप्रेमींतून होत आहे. 

उत्तर प्रदेशातील बरेलीचा मांजा, हैदराबादेतील लाकडी चक्री, लखनौचा पतंग देशात ब्रँड बनले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही वातावरणात गगनात उंच भरारी घेऊ शकणारे पतंग औरंगाबादेत तयार होतात. मात्र, याचे हे वैशिष्ट्य कोणी जाणलेच नाही. म्हणून येथे तयार होणाऱ्या पतंगाचा ब्रँड बनूूशकला नाही. येथील विक्रेत्यांनी स्वत:च्या व्यावसायिक गुणांचा वापर करून निजामाबादपर्यंत औरंगाबादी पतंग नेऊन पोहोचविला आहे. मात्र, विक्रेत्यांनाही आर्थिक मर्यादा येत असल्याने ते हतबल आहेत. वेरूळ महोत्सवाच्या धर्तीवर औरंगाबादेत राष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित केला, तर यानिमित्ताने पतंगबाजीमध्ये देशात नामवंत असलेले पतंगबाज शहरात येतील. त्याला सर्वत्र प्रसिद्धी मिळेल व येथील पतंगाची लोकप्रियता वाढेल. आपसूकच येथील कारागिरांना ‘अच्छे दिन’ येतील.

शहरात मागील तीन-चार पिढ्यांपासून पतंग तयार करणारे १५० ते २००  कारागीर आहेत. पतंग तयार करण्यात सर्व परिवार हातभार लावत असतो. सर्व कारागिरांचे परिवार मिळून जवळपास १ हजार सदस्य या पतंग तयार करण्यात गुंतलेले असतात. या परिवारांमध्ये एवढी क्षमता आहे की, ते वर्षाला १ कोटीपेक्षा अधिक पतंग तयार करूशकतात. मात्र, मागणी तेवढी नसल्याने ५० लाख पतंग तयार केले जातात. कच्च्यामालाचे भाव वाढल्याने व मागील दोन ते तीन वर्षांपासून पतंगाची किंमत स्थिर राहिल्याने कारागीर अडचणीत आले आहेत. १०० पतंग बनविल्यानंतर ३० ते ४० रुपये कमिशनपोटी मिळतात. वर्षभर होलसेलर्सच या कारागिरांना आर्थिक मदत करीत असतात. त्यांच्या सुख-दु:खात पैसे पुरवतात. मागणीनुसार पतंग तयार करून पैशांची परतफेड कारागिरांना करावी लागते. यामुळे लाखो पतंगांची  निर्मिती करूनही या कारागिरांची झोळी रिकामीच असते. 

शहरात कुठे तयार होतात पतंग
शहरात पतंग तयार करणारे कारागीर आहेत. मोंढ्यातील गवळीपुरा, बुढीलाईन, किराडपुरा, संजयनगर, शाहबाजार, कटकटगेट, हिलाल कॉलनी, भडकलगेट परिसर, मुकुंदवाडी, शाहगंज, रशीदपुरा, नूतन कॉलनी, गणेश कॉलनी या परिसरात हे कारागीर राहतात. यातील बहुतांश जणांचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. 

औरंगाबादी पतंगाची वैशिष्ट्ये
कामटी जाड असेल, तर पतंग उडत नाही. यासाठी तुळसीपूरहून येणाऱ्या कामटीला चाकूने सोलून पातळ करतात. त्यानंतर पतंग कमी हवेत उडण्यासाठी कामटी किती ताणायची येथेच कारागिराचे कौशल्य पणाला लागते. हे कौशल्य येथील कारागिरांनी अनुभवातून अवगत केले आहे. पतंगाच्या खालच्या दोन्ही बाजूंना काठाला ताव दुमडून त्यात दोर भरली जाते. यामुळे पतंग फाटत नाही, असे पतंग औरंगाबादेत व लखनौमध्ये बनत असल्याची माहिती कारागीर अमरसिंग राजपूत यांनी दिली. 

महोत्सवामुळे चालना मिळेल 
औरंगाबादेतही पतंगबाजीगर आहेत. त्यांनाही राज्यस्तरीय पतंग महोत्सवात आमंत्रित करावे. शहरात पतंगबाजीगरांच्या संघटनाही आहेत. पतंग महोत्सवामुळे येथील व्यवसायाला चालना मिळेल.
-जय पाटील, पतंगबाजीगर

महोत्सव भरविण्यासाठी प्रयत्न करू 
आम्ही लहानपणापासून पतंग उडवितो. येथील पतंग उडविण्यास सर्वोत्तम आहेत. कारागिरांनी केलेली मागणीचा मी नक्कीच विचार करीन. याची सुरुवात औरंगाबाद स्थानिक महोत्सवापासून करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
-किशनचंद तनवाणी, माजी आमदार

राष्ट्रीय स्तरावर पतंग महोत्सव आवश्यक 
कारागीर दर्जेदार पतंग बनवितात. मात्र, आम्ही बनविलेल्या पतंगाची ख्यातीच कोणाला माहिती नसेल, तर ते पतंग देशभरात विकणार कसे. यासाठी राष्ट्रीय स्तरावरील पतंग महोत्सवाचे शहरात दरवर्षी आयोजन करावे. जेणेकरून देशभरातून येणारे पतंगबाज येथील पतंगाचा प्रसार-प्रचार करतील व  येथील पतंगाला मागणी वाढेल.
-कपिल राजपूत, कारागीर

जीएसटी रद्द करावा
पतंगाचा ताव, मांजा, चक्री यावर ५ टक्के जीएसटी आकारला जातो. दुसरीकडे पतंगाचे भाव वाढत नाहीत. परिणामी, कारागिरांचे उत्पन्न वाढत नाही. पतंग व्यवसायातील कारागीर व विक्रेत्यांना जिवंत ठेवण्यासाठी कच्च्या मालावरील जीएसटी रद्द करावा.
- सय्यद अमिनोद्दीन, पतंग विक्रेते

Web Title: To take the plunge; Aurangabad kite wants attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.