शिक्षणाचे पावित्र्य राखा
By Admin | Published: September 6, 2016 12:56 AM2016-09-06T00:56:25+5:302016-09-06T01:06:07+5:30
औरंगाबाद : स्पर्धेच्या युगात शिक्षकांना सज्ज राहावेच लागेल. शिक्षक हे केवळ विद्यार्थीच नव्हे तर एक नवीन पिढी घडवत असतात.
औरंगाबाद : स्पर्धेच्या युगात शिक्षकांना सज्ज राहावेच लागेल. शिक्षक हे केवळ विद्यार्थीच नव्हे तर एक नवीन पिढी घडवत असतात. दर्जेदार आणि गुणवत्ताप्रधान शिक्षण देण्याबरोबरच शिक्षणाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारीही शिक्षकांना स्वीकारावी लागेल, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून जि. प. शिक्षण विभागाच्या वतीने २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन शैक्षणिक वर्षातील ३१ शिक्षकांना सोमवारी जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संत एकनाथ रंगमंदिरमध्ये सकाळी ११.३० वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे अध्यक्ष श्रीराम महाजन होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड, शिक्षण सभापती विनोद तांबे, समाजकल्याण सभापती शीला चव्हाण, पंचायत समितीचे सभापती मनोज शेजूळ हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी केले. डिसेंबर २०१७ पर्यंत जिल्ह्यातील सर्व जि. प. शाळा प्रगत करण्याचा मानस मोगल यांनी यावेळी व्यक्त केला.
आपल्या भाषणात हरिभाऊ बागडे पुढे म्हणाले की, अलीकडच्या काळात शिक्षण क्षेत्रामध्ये जीवघेणी स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थी टिकले, तर शिक्षकांची नोकरी टिकेल. विनाअनुदानित इंग्रजी शाळांप्रमाणे आता स्वयं अर्थसहायित शाळांचे पेव फुटले आहे. (पान ५ वर)
‘बुके’ ऐवजी ‘बुक’ देऊन सत्कार
शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी सुरुवातीलाच जाहीर केले की, शासनाच्या निर्देशानुसार पुरस्कारप्राप्त शिक्षकांना ‘बुके’ देण्याऐवजी ‘बुक’ देऊन सन्मानित केले जाणार आहे. त्यामुळे काही शिक्षकांचा हिरमोड झाला. पण, प्रत्यक्षात जेव्हा सपत्नीक शिक्षकांना जिल्हा पुरस्काराने सन्मानित केले जात होते, त्यावेळी मात्र शिक्षकांचा आनंद गगनात मावत नव्हता. सीईओ अर्दड यांनी यापुढे शिक्षक दिनीच पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जाईल, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमात एका शिक्षकाने बासरीवर ‘सैराट’ चित्रपटातील गाण्याची धून वाजविली. तेव्हा उपस्थित पाहुण्यांमध्ये थोडा वेळ तो थट्टेचा विषय झाला. मात्र, शिक्षकांना पुरस्कार सुरू होण्याअगोदर पुन्हा एकदा त्या शिक्षकाला पाचारण करण्यात आले आणि त्याने देशभक्तीपर गाण्याची धून वाजवून मंत्रमुग्ध केले.