न घाबरता औरंगाबादच्या नाव बदलासाठी गुप्त मतदान घ्या, मग ठरवू : इम्तियाज जलील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 12:24 PM2022-07-12T12:24:28+5:302022-07-12T12:26:01+5:30
सर्वसामान्य औरंगाबादकर नामकरणाच्या विरोधात आहेत. ज्यांचा या शहराशी संबंध नाही ते कुठे तरी मुंबईत बसून आमच्या शहराबाबत निर्णय घेतात.
औरंगाबाद: शहराचे नाव बदल करण्याचा उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेटमध्ये झालेला निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही पुन्हा आमच्या कॅबिनेट आणू आणि पास करू असे जाहीर केले, यातून स्पष्ट होतंय की छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठी होतोय. बहुसंख्य नागरिकांना शहराचे नाव बदल नकोय, न घाबरता जनमत चाचणी घेऊन गुप्त मतदान घ्यावे, असे आव्हान खासदार इम्तियाज जलील यांनी आज केले.
शहराच्या संभाजीनगर नामकरणाच्या विरोधात आज दुपारी एमआयएम मूक मोर्चा काढणार आहे. तत्पूर्वी खा. जलील यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वसामान्य औरंगाबादकर नामकरणाच्या विरोधात आहेत. ज्यांचा या शहराशी संबंध नाही ते कुठे तरी मुंबईत बसून आमच्या शहराबाबत निर्णय घेतात. फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वी या नावाची घोषणा केली म्हणून नाव बदलले गेले आहे. न घाबरता या नावासाठी गुप्त मतदान घेण्यात यावे. त्यानंतर ठरावा असे आव्हान खा. जलील यांनी केले.
आम्ही नावाच्या विरोधात आहे म्हणजे आम्ही औरंगजेबाचे भक्त आहोत असे नाही. आम्ही सर्व महापुरुषांचा आदर करतो.औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे. युनिस्कोच्या यादीत शहर आहे. ४०० वर्षांपूर्वी काय झाले होते ते महत्वाचे नाही. आता आपल्याला पुढे जायचे आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी हिंदू-मुस्लीम असा वाद निर्माण करत आहेत. मी मूक मोर्चा एक सामान्य अभिमानी औरंगाबादकर म्हणून सहभागी होणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.
माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शहरात झालेल्या भाषणात पहिल्यांदा आम्ही शहराचा विकास करू असे जाहीर केले होते. सत्ता टिकविण्यासाठी जाताजाता त्यांनी हा निर्णय का घेतला. शहराचा विकास केला असता तर आम्ही नाव बदलायचा प्रस्ताव आणला असता. शहरवासियांना नोकऱ्या, पाणी पाहिजेत नाव बदलाची कोणाची मागणी नाही. आपल्याला प्राथमिकता ठरवावी लागेल, असेही खा. जलील यांनी स्पष्ट केले. सर्व राजकीय पक्ष, संघटना यांनी लोकांचे मत लक्षात घ्यावे आणि आजच्या मोर्चात लोकशाही मार्गाने सहभागी व्हावे असे आवाहन खा. जलील यांनी केले.