लसींचा साठा घेऊन जा, अन्यथा पगारच मिळणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:02 AM2021-02-15T04:02:26+5:302021-02-15T04:02:26+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयास कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तिसरा इन्स्टॉलमेंट मिळाला आहे. यात औरंगाबाद, जालना, परभणी ...
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयास कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तिसरा इन्स्टॉलमेंट मिळाला आहे. यात औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी तब्बल १ लाख १० हजार डोस मिळाले. परंतु जुनाच साठ शिल्लक असल्याने नवीन लसी घेऊन जाण्याचे अनेकांकडून टाळले जात आहे. परिणामी, लसींचा साठा घेऊन जा, अन्यथा पगार थांबविला जाईल, अशी सूचना करण्याची वेळ आरोग्य विभागावर ओढावली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासाठी पहिल्या इन्स्टॉलमेंटमध्ये ३४ हजार, तर दुसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये ३६ हजार लसींचे डोस मिळाले होते. आता औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी ‘कोव्हिशिल्ड’चे ६० हजार आणि ‘कोव्हॅक्सिन’चे ५० हजार डोस मिळाले. यात जालना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने तत्काळ लसी घेऊन जाण्यास प्राधान्यक्रम दिला. पण औरंगाबाद, परभणी, हिंगोलीतील आरोग्य संस्थांनी प्राप्त झालेले डोस नेण्याकडे दुर्लक्ष केले. त्याचे कारण म्हणजे यापूर्वी प्राप्त झालेल्या लसींचा साठाच अनेकांचा अद्याप संपलेला नाही. लसीकरणाचे प्रमाण कमी असल्यानेच हे डोस संपलेले नाहीत. त्यामुळे नवा साठा ठेवायचा कुठे? असा प्रश्न अनेकांपुढे पडला आहे. त्यातून नवा साठा घेऊन जाण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.
जिल्ह्यात ५०.५४ टक्के लसीकरण
एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात ११ फेब्रुवारीपर्यंत ३३ हजार ९०० आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ५०.५४ म्हणजे १७ हजार १३६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता दुसर्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्संचे लसीकरण सुरू झाले आहे.
लसी नेणे बंधनकारक
लसींचा तिसरा इन्स्टॉलमेंट मिळाला आहे. यात ‘कोव्हिशिल्ड’चे ६० हजार आणि ‘कोव्हॅक्सिन’चे ५० हजार डोस मिळाले आहे. लसींचा जुना साठा असल्याने काही जण लसी घेऊ जात नाही. पण लसी नेणे बंधनकारक केले आहे. लसींचा साठा घेऊन जावे, अन्यथा पगार थांबविला जाईल, अशी सूचना सर्वांना केली आहे.
- डाॅ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक