हे घ्या पत्र,संभाजीराजेंना गणोजींनी पकडून दिल्याचे पुरावे नाहीत; 'छावा'वर शिर्केंचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:51 IST2025-02-27T12:50:50+5:302025-02-27T12:51:42+5:30
ही बाब माहिती अधिकारात २७ जुलै २००९ ला उघड झालेली असतानाही 'छावा' चित्रपटात शिर्के घराण्याचा खोटा इतिहास दाखविला असल्याचा आक्षेप शिर्के घराण्याच्या तेराव्या पिढीतील वंशजाने घेतला आहे.

हे घ्या पत्र,संभाजीराजेंना गणोजींनी पकडून दिल्याचे पुरावे नाहीत; 'छावा'वर शिर्केंचा आक्षेप
- दादासाहेब गलांडे
पैठण : गणोजीराजे शिर्के यांनी छत्रपती संभाजीराजे यांना पकडून दिले असल्याचे ऐतिहासिक संदर्भ अथवा पुरावे महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयात उपलब्ध नाहीत. ही बाब माहिती अधिकारात २७ जुलै २००९ ला उघड झालेली असतानाही 'छावा' चित्रपटात शिर्के घराण्याचा खोटा इतिहास दाखविला जात असल्याने आम्हाला खूप वेदना होत आहेत, अशी भावना शिर्के घराण्याच्या मुंगी पैठण शाखेच्या तेराव्या पिढीतील रामकृष्ण शिर्के यांनी व्यक्त केली.
'लोकमत'शी संवाद साधताना रामकृष्ण शिर्के म्हणाले की, छावा चित्रपटात गणोजीराजे शिर्के यांनी दगाफटका करून छत्रपती संभाजीराजेंना मोगलांना पकडून दिल्याचे दाखवले आहे. या चित्रीकरणाला शिर्के घराण्याचा आक्षेप आहे. शिर्के घराणे हे स्वराज्यासाठी विश्वासपात्र तसेच एकनिष्ठ होते. 'छावा' सिनेमातील प्रसंगामुळे राज्यासह देशात शिर्के घराण्याची जाणूनबुजून बदनामी केली जात आहे. ही बदनामी थांबवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
याबाबतचे ऐतिहासिक संदर्भ अथवा पुरावे पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन कार्यालयात उपलब्ध नाहीत ही बाब माहिती अधिकारात २७ जुलै २००९ ला उघड झालेली आहे. खरा इतिहास जनतेसमोर आणण्याची मागणीही शिर्के यांनी केली. 'छावा' चित्रपटाचे लेखक, पटकथा लेखक, संवाद लेखकावर गुन्हे नोंदवावे, अशी मागणी सातारा येथील सुहासराजे शिर्के यांनी मुख्यमंत्र्यांसह पोलिस महासंचालकांकडे केल्याची माहिती रामकृष्ण शिर्के यांनी दिली.
काय म्हटले आहे पत्रात?
पुराभिलेख संचालनालयाने रामकृष्ण शिर्के यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपला दि. १ जुलै २००९ रोजीचा अर्ज प्राप्त झाला असून याबाबत खालीलप्रमाणे खुलासा करण्यात येत आहे. मुद्दा क्र. १. गणोजीराजे शिर्के यांनी संभाजीराजे यांना पकडून दिले असल्याचे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ अथवा पुरावे या कार्यालयात उपलब्ध नाहीत. या पत्रावर पुराभिलेख संचालनालयाचे संचालक डॉ. भास्कर घाटावकर यांची स्वाक्षरी आहे.