चहा प्यायला म्हणून नेले आणि कार्यकर्त्यांनी केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:02 AM2021-07-28T04:02:07+5:302021-07-28T04:02:07+5:30

औरंगाबाद: विजयनगर-मेहरनगर येथील महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर टोकन मिळण्यातून शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांत सोमवारी झालेल्या मारहाणप्रकरणी अखेर मध्यरात्री युवा सेनेचे ...

Taken to drink tea and beaten by activists | चहा प्यायला म्हणून नेले आणि कार्यकर्त्यांनी केली मारहाण

चहा प्यायला म्हणून नेले आणि कार्यकर्त्यांनी केली मारहाण

googlenewsNext

औरंगाबाद: विजयनगर-मेहरनगर येथील महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर टोकन मिळण्यातून शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांत सोमवारी झालेल्या मारहाणप्रकरणी अखेर मध्यरात्री युवा सेनेचे उपसचिव तथा माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळसह सात कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला. जंजाळ यांनी आपण चहा प्यायला जाऊ, असे म्हणून कारमध्ये बसवून रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यालयात नेले आणि तेथे बेदम मारहाण केल्याची तक्रार भाजप पदाधिकारी प्रा. गोविंद केंद्रे यांनी जवाहरनगर पोलिसांत दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी जंजाळ यांच्यासह अमोल पाटे, आकाश राऊत आणि अन्य चार कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविला.

या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, लसीकरण केंद्रावर सोमवारी टोकन मिळण्याच्या वादातून भाजप ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष प्रा. केंद्रे आणि जंजाळ समर्थकांमध्ये सोमवारी दुपारी जोरदार राडा झाला होता. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या प्रा. केंद्रे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी प्रा. केंद्रे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, सोमवारी ते मनपा लसीकरण केंद्रावर गेले असता, आठ दिवसांपासून जंजाळ यांचे आठ ते दहा कार्यकर्ते ओळखीच्या लोकांना रांगेत उभे करत होते. लसीकरण केंद्रावर पान-तंबाखू खाऊन थुंकणे, गोंधळ करणे असे प्रकार करत होते. याबाबत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, ‘हे लसीकरण केंद्र तुमच्या बापाचे आहे का, असे म्हणून आम्ही काहीही करू, तुम्ही आम्हाला बोलणारे कोण, आम्ही जंजाळसाहेबांचे कार्यकर्ते आहोत’, असे म्हणून त्यांनी बाचाबाची करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एका कार्यकर्त्याने जंजाळ यांना फोन करून बोलावून घेतले. काही वेळात जंजाळ तेथे आले व त्यांनी ‘आपण चहा प्यायला जाऊ’, असे म्हणून कारमध्ये बसवून भुमरे यांच्या कार्यालयात नेले. मंत्री कामात असल्याने कार्यालयाबाहेर उभा असताना अचानक कुणीतरी मागून पाठीत दोन-चार बुक्के मारले. त्याचवेळी समोर उभा असलेल्या अनोळखी व्यक्तीने शिवीगाळ करून चार ते पाच चापटा कानाखाली मारल्या. यामुळे चक्कर येऊन पडलो. यानंतर कुणीतरी आपल्याला रुग्णालयात दाखल केल्याचे केंद्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

चौकट

या कलमांनुसार गुन्हा

केंद्रे यांच्या तक्रारीच्या आधारे जवाहरनगर पोलीस ठाण्यात जंजाळ यांच्यासह कार्यकर्त्यांवर भादंवि कलम १४३, १४७, १४९ (दंगल करणे), कलम ३२३, ३२४ (मारहाण करून गंभीर दुखापत करणे), ५्र५, ५०६ (जीवे मारण्याची धमकी देणे), कलम १३५ (गैरकायद्याची मंडळी जमविणे) आदी कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भरत पाचोळे तपास करीत आहेत.

Web Title: Taken to drink tea and beaten by activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.