एक गोळी घेतली की, डोकं कसं तड तड तड; नशेसाठी झोपेच्या गोळ्यांची सर्रास विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 12:49 PM2022-03-24T12:49:36+5:302022-03-24T12:56:44+5:30
डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गल्लीबोळातील औषध विक्रेत्यांकडून तरुणांना झोपेच्या गोळ्यांचा ‘डोस’
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : ‘एक घोट घेतला की डोकं कसं तड तड...’ हे गाणं सध्या अनेकांच्या तोंडातून ऐकायला मिळत आहे; परंतु रोज एक घोट म्हणजे मद्य खरेदी करून पिणे खिशाला परवडत नाही म्हणून काहींकडून नशेसाठी थेट झोपेच्या गोळ्यांचा वापर केला जात आहे. डाॅक्टरांची चिठ्ठी असेल तरच औषध विक्रेत्यांनी झोपेच्या गोळ्या विकणे बंधनकारक आहे. मात्र, डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गल्लीबोळातील औषध विक्रेत्यांकडून बटण, ऑरेंज, कीटकॅट नावाखाली झोपेच्या गोळ्यांचा ‘डोस’ देण्याचा उद्योग सुरू असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे.
या गोळ्या खाल्ल्यानंतर इतर व्यसन केल्यानंतर येतो तसा कोणताही वास येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य घरांतील मुलांबरोबर उच्च स्तरातील मुलेही गोळ्यांच्या व्यसनाला बळी पडत आहेत. काहीजण चौपट पैसे घेऊन गोळ्यांची विक्री करीत आहेत.
बटणनंतर आता कीटकॅट नाव
झोपेच्या काही ‘हायपाॅवर’ गोळ्या बटण नावाने छुप्या पद्धतीने विकल्या जात; परंतु बटण हे नाव सर्वांना माहिती झाले, त्यामुळे आता ऑरेंज, कीटकॅटच्या नावाने या गोळ्या चालतात.
या भागात ‘स्टिंग’
शहरातील घाटी परिसर, जवाहर काॅलनी, त्रिमूर्ती चौक, आकाशवाणी चौक, सेव्हन हिल रोड, जय भवानीनगर, पुंडलिकनगर, शिवाजीनगर, देवळाई रोडसह शहरातील ६५ औषध दुकानांवर झोपेच्या गोळ्यांची मागणी करण्यात आली.
काय आढळले?
काही औषध विक्रेत्यांनी गोळ्या नसल्याचे, तसेच डाॅक्टरांकडून चिठ्ठी आणण्यास सांगितले. तर काहीजण सरळ गोळ्या देऊन मोकळे झाले. मागितलेल्या गोळ्यांपेक्षा अधिक इफेक्टिव्ह गोळ्या असल्याचे सांगत एका औषध विक्रेत्याने संपूर्ण स्ट्रीपच दिली. काहींनी केवळ एक गोळी दिली. दोन विक्रेत्यांनी तीन गोळ्या दिल्या.
बहुतांश विक्रेत्यांकडून नियमांचे पालन
डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्रेत्यांनी झोपेच्या गोळ्या देता कामा नये. बहुतांश विक्रेते याचे पालन करतात. काहीजण त्याचे पालन करत नसतील. त्यांनीही नियमाचे पालन करावे. अनेक विक्रेते झोपेच्या गोळ्या ठेवतही नाहीत.
- विनोद लोहाडे, सचिव, औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन
नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई
औषध दुकानांची नियमितपणे तपासणी केली जाते. डाॅक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय झोपेच्या गोळ्या देता कामा नये. याकडे कोणी दुर्लक्ष करीत असेल तर कारवाई केली जाईल.
- गिरीश हुकरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन (औषधे)
---------