एमआयडीसीत छोटे कंत्राट घेत त्यांनी पडेगावात उघडला थेट बनावट नोटांचा छापखाना
By सुमित डोळे | Published: November 3, 2023 12:28 PM2023-11-03T12:28:12+5:302023-11-03T12:28:53+5:30
भाडेतत्त्वावर घर, मदतीसाठी नियुक्त दोन असिस्टंटचा पगारही बनावट नोटांवरच
छत्रपती संभाजीनगर : वाळुज औद्योगिक वसाहतीमध्ये लेबर व अन्य साहित्य पुरवण्याचे छोटे कंत्राट घेता घेता तिघांनी एकत्र येत बनावट नोटांचा छापखानाच उघडला. पडेगावात भाडेतत्त्वाच्या घरात अद्ययावत प्रिंटरद्वारे ते ५०० रुपयांच्या नोटा छापत होते. सहा दिवस सलग तपास करत शेवटच्या कडीपर्यंत पोहोचून सात आरोपी निष्पन्न झाल्याचे उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी सांगितले.
देवेंद्र उर्फ भय्या अर्जुन मोरे, राहुल गौतम जावळे, अंबादास राम ससाने उर्फ अरुण भास्कर वाघ उर्फ मेजर, राजू श्याम शिंदे, बलराम उर्फ करण सुरेश सिंग, पांडुरंग भानुदास पाटील, कुणाल उर्फ बंटी विजयदास वैष्णण मिळून हे रॅकेट चालवत हाेते. नांदेडकर यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक हरिष खटावकर, झनकसिंग घुनावत यांनी शुक्रवारी संजयनगरात सापळा रचला होता. त्यात तीन लहान मुले पाचशेच्या बनावट नोटा देऊन किरकोळ वस्तू घेऊन ४५० रुपयांचे सुट्टे घेत होते. मोरे, जावळे त्यांच्याकडून हे काम करवून घेत होते. खटावकर यांनी पाचही जणांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी पुढे सलग चार दिवस तपास केला. त्यात मेजर व अन्य चौघांची नावे निष्पन्न झाली. छापखान्याचा भांडाफोड झाल्यानंतर सर्वजण नाशिकमध्ये लपून बसले होते. पोलिसांनी तेथे पोहोचत सर्वांना अटक केली. सहायक आयुक्त रणजित पाटील, निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली घुनावत, नरसिंग पवार, गणेश वैराळकर, बाबासाहेब कांबळे, प्रकाश गायकवाड, विनोद गिरी, सुखदेव जाधव, समाधान काळे, अनिल थोरे, गणेश वाघ, संदीप वैद्य, गोकुळ खटावकर यांनी कारवाई केली.
मैत्री ते छापखान्याचा प्रवास
मेजरवर यापूर्वी दोन फसवणुकीचे गुन्हे आहेत. लष्करात छोटे-मोठे इलेक्ट्रिकचे काम करत स्वत:लाही मेजर म्हणवून घ्यायला लागला. वाळुजमध्ये तेच काम करताना त्याची कुणाल व पांडुरंगसोबत ओळख झाली व मैत्री होत छापखान्यापर्यंत पोहोचली.घरातून रागावून पळून आलेला राजू व केळी विकणाऱ्या बलराम त्यांच्या हाती लागले. काम देण्याचे सांगून त्यांना असिस्टंट केले. पगार, खर्चासाठी त्यांना बनावट नोटाच मिळायच्या. सायंकाळीच त्या खर्च करण्याची अट होती. अद्ययावत प्रिंटर विकत घेण्याच्या निमित्ताने जावळेसोबत ओळख झाली. जावळे व मोरे नातेवाईक असल्याने त्यांनी सहभागी होत नोटा विकण्याची जबाबदारी घेतली.