टाकळी राजेराय अंगणवाडीतून मिळतोय निकृष्ट दर्जाचा आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:04 AM2021-06-03T04:04:17+5:302021-06-03T04:04:17+5:30
टाकळी राजेराय : येथील अंगणवाड्यातून बालकांना घरपोच दिला जाणारा आहार हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यावर ...
टाकळी राजेराय : येथील अंगणवाड्यातून बालकांना घरपोच दिला जाणारा आहार हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यावर ग्रामपंचायत आक्रमक झाली असून त्यांनी संबंधित विभागाला धारेवर धरत नवीन धान्य देण्याची मागणी केली. तर अंगणवाडीत पुरवठा झालेला आहार पुन्हा परत पाठविण्यात आला आहे.
बालकांमधील कुषोषण कमी होण्यासाठी त्यांना सकस आहार देण्यासाठी शासनाच्या वतीने शालेय पोषण आहाराचे वितरण केले जाते. सध्या कोरोनामुळे शाळा, अंगणवाडी बंद असल्या तरी बालकांसाठी घरपोच सकस आहार मिळावा म्हणून धान्य वाटप केले जाते. यात दाळ, चणा, सुगडी, साखर, तेल आदी साहित्याचे पाकीट घरपोच दिले जात आहे. टाकळी राजेराय येथील अंगणवाडीत आलेले आहाराचे साहित्य निकृष्ट दर्जाचे येत असल्याचा आरोप काही पाल्यांकडून केला गेला. ही बाब त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या निदर्शनात आणून दिली. तेव्हा अंगणवाडी सेविकांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. उपसरपंच गुलाब कुचे यांनी अंगणवाडीला भेट देऊन शालेय पोषण आहाराचे साहित्य तपासले. यात निकृष्ट दर्जाचा माल दिसून आला. त्यांनी तालुका पर्यवेक्षिका यांच्याकडे तक्रार केली. अखेर मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तालुका पर्यवेक्षिका रजनी जोशी यांनी पोषण आहाराचा पंचनामा केला. सर्व धान्य पुन्हा परत पाठविले. ग्रामपंचायत सदस्यांनी जो पर्यंत दर्जेदार आहार साहित्य दिले जाणार नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत ते स्वीकारणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. यावेळी अबाजी तांदळे, अंगणवाडी सेविका वंदना दहिवाल, कल्पना सोनवणे, शोभा घुले, सरस्वती पवार यांची उपस्थिती होती.
--
मुलांच्या जीवाशी मांडला जातो खेळ
प्रशासनाकडून निकृष्ट दर्जाचा आहार अंगणवाड्यांमध्ये पाठविला जात आहे. यामुळे बालकांमधील कुपोषण कमी न होता वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. तर प्रशासनाकडून बालकांच्या जीवाशी खेळ मांडू नये, अशी मागणी केली जात आहे. या आहाराबरोबरच गोडतेलसुद्धा दिले जाते. परंतु गोडतेलाऐवजी आता साखर दिली जात आहे. तिही निकृष्ट दर्जाची साखर आहे.
----
फोटो : टाकळी राजेराय येथील निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा पंचनामा करताना तालुका पर्यवेक्षिका रजनी जोशी, उपसरपंच गुलाब कुचे व अन्य.