‘हाऊसवाईफ’ पुरे; आता बनायचे तलाठी मॅडम; ‘सेकंड इनिंग’साठी महिलां जिद्दीने परीक्षा केंद्रावर
By संतोष हिरेमठ | Published: August 23, 2023 02:10 PM2023-08-23T14:10:39+5:302023-08-23T14:11:45+5:30
तलाठी परीक्षेच्या माध्यमातून संसारिक जबाबदारी सांभाळणाऱ्या अनेक महिलांची ‘सेकंड इनिंग’ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर : तलाठी परीक्षेच्या केंद्रावर वेळेवर जाण्याची प्रत्येक परीक्षार्थीची गडबड सुरू होते. त्याच वेळी काही महिला अश्रू अनावर झालेल्या मुलांना पतीकडे, नातेवाइकांकडे सोपवीत होते. ‘बाळ मी लवकरच येते, तुला येताना खाऊ आणते..’ अशी समजूतही घालत त्या केंद्रावर रवाना होत होत्या. प्रत्येकामध्ये एक जिद्द पाहायला मिळत होती, ती म्हणजे ‘हाऊसवाईफ पुरे, आता तलाठी बनायचे’.
तलाठी परीक्षेच्या माध्यमातून संसारिक जबाबदारी सांभाळणाऱ्या अनेक महिलांची ‘सेकंड इनिंग’ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. परीक्षा देणाऱ्यांमध्ये विवाहित महिलांची संख्या लक्षणीय आहे. विवाहबंधनात अडकल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी, मुलांचा सांभाळ, घराचा सांभाळ यात करिअर करणे मागे पडते. मात्र, मूलबाळ असलेल्या महिलांनी तलाठी परीक्षा दिली. त्यासाठी पतीसह कुटुंबीयांनी पाठिंबा दिला, असे अनेक महिलांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दोन मुलांना सांभाळून अभ्यास
एक ६ वर्षांचा आणि एक ३ वर्षांचा मुलगा आहे. दोघांना सांभाळत तलाठी परीक्षेचा अभ्यास केला. घरातील सर्व काम करून अभ्यासासाठी वेळ काढला. यापूर्वीही परीक्षा दिलेली आहे. यावेळी यश मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- तारा उसरे, जरंडी
रोज ३ तास अभ्यास
अडीच वर्षांचा मुलगा आहे. तलाठीच्या परीक्षेसाठी रोज ३ तास अभ्यासासाठी वेळ दिला. त्यासाठी रेफरन्स बुकची मदत घेतली. कोरोनानंतर पहिलीच मोठी भरती परीक्षा आहे. परीक्षेसाठी पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला आले.
- शीतल काटे, पुणे
तिच्या शिक्षणाचे चीज व्हावे
पत्नी मिलन जाधव हिने घेतलेल्या शिक्षणाचे चीज व्हावे, यासाठी तिला या परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले. ४ वर्षांचा मुलगा आहे. सर्व सांभाळून तिने परीक्षेची तयारी केली. स्पर्धा परीक्षा देणे हे पुरुषांपेक्षा महिलांना अवघड असते. कारण त्यांना संसारही सांभाळावा लागतो.
- गणेश जाधव, छत्रपती संभाजीनगर