तलाठी परीक्षेत घोळ; आरोपींकडे २६ हॉलतिकिटे, खोलीत चार ‘मख्खी’ हेडफोन सापडले

By सुमित डोळे | Published: September 14, 2023 07:50 PM2023-09-14T19:50:42+5:302023-09-14T19:54:51+5:30

आरोपी परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून अनेक ऑनलाइन हॉलतिकिटे मिळवायचे. त्यातून काहींना संपर्क साधयचे

Talathi Exam fraud; Accused has 26 hall tickets, four 'mukkhi' headphones in the room | तलाठी परीक्षेत घोळ; आरोपींकडे २६ हॉलतिकिटे, खोलीत चार ‘मख्खी’ हेडफोन सापडले

तलाठी परीक्षेत घोळ; आरोपींकडे २६ हॉलतिकिटे, खोलीत चार ‘मख्खी’ हेडफोन सापडले

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परीक्षेत परीक्षार्थींना केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच उत्तरे पुरवणाऱ्या आरोपींकडे आतापर्यंत २६ हॉलतिकिटे आढळली आहेत. शिवाय, आयऑन परीक्षा केंद्राचा पर्यवेक्षक शाहरुख युनूस शेख (२७, रा. भायगाव, वैजापूर) याच्या खोलीवर दोन ‘मख्खी’ (कॉपीसाठी वापरले जाणारे अत्यंत बारीक) हेडफोन आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले. मात्र, काही परीक्षार्थींच हॉलतिकिटे मिळवून आरोपीशी स्वत:हून संपर्क साधून उत्तीर्ण करून देण्याची ‘ऑफर' देत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

५ सप्टेंबर रोजी चिकलठाण्यातील आयऑन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेर राजू नागरे (२९, रा. कातराबाद) याला एमआयडीसी सिडको पोलिसांनी रंगेहाथ पकडले. चौकशीत परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच तो परीक्षार्थींना उत्तरे पुरवत होता. रॅकेटचा मास्टरमाईंड व रेकॉर्डवरील गुन्हेगार दत्ता नलावडे पसार झाला. त्याच्यासह पर्यवेक्षक शाहरुख, पवन सुरेश सिरसाट (२६, रा. ब्रिजवाडी) आणि सफाई कर्मचारी बाली रमेश हिवराळे व विकी रोहिदास सोनवणे यांच्या मदतीने ते आयऑन सेंटरमध्ये परीक्षार्थींना उत्तरे पुरवत होते.

खोलीची झाडाझडती
दत्ता व पर्यवेक्षक शाहरुख एकाच खोलीत राहायचे. उपनिरीक्षक आत्माराम घुगे, अंमलदार प्रकाश सोनवणे, संतोष सोनवणे, देवीदास काळे, संतोष गायकवाड यांनी अटकेतील शाहरुखच्या टीव्ही सेंटरच्या खोलीची झाडाझडती घेतली. उत्तरे सांगण्यासाठी आवश्यक पुस्तके, ॲन्सर कीसह २६ तलाठी परीक्षेचे हॉलतिकीट पोलिसांना सापडले. शिवाय, डिजिटल कॉपीसाठीचे हेडफोन, मास्टरकार्डही आढळले.

स्वत:हून ऑफर द्यायचे
आरोपी परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून अनेक ऑनलाइन हॉलतिकिटे मिळवायचे. त्यातून काहींना संपर्क साधून यासाठी उत्तरे पुरवत असल्याचे शाहरुखने सांगितले. २६ हॉलतिकिटांपैकी काही परीक्षार्थींनीदेखील हे सांगितले. मात्र, हॉलतिकिटे कोण पुरवायचे, हे कळू शकले नाही. दत्ता व पूर्वीच्या कारवाईतील गोमलाडूदेखील अद्याप पसार आहेत.

 

Web Title: Talathi Exam fraud; Accused has 26 hall tickets, four 'mukkhi' headphones in the room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.