Talathi Exam: पर्याय सोडून दुसरेच केंद्र दिले; उमेदवारांना आर्थिक भुर्दंड
By विकास राऊत | Published: August 22, 2023 02:05 PM2023-08-22T14:05:47+5:302023-08-22T14:08:44+5:30
परीक्षेच्या नियोजनाचा गोंधळ; प्रशासनाचे टीसीएसकडे बोट
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा प्रशासनातील रिक्त असलेल्या १३८ तलाठी पदांच्या जागांसाठी ७४ हजार ७८४ उमेदवारांनी अर्ज केले असून, १७ ऑगस्ट ते २४ सप्टेंबर २०२३ या काळात सुट्या वगळून १९ दिवस परीक्षेचे वेळापत्रक ठरविले असून, परीक्षेच्या नियोजनाचा गोंधळ उडाला आहे. परीक्षेचे पूर्ण संचलन टीसीएस या संस्थेकडे असल्याचे सांगून प्रशासनाने हात वर केले आहेत.
परीक्षेसाठी उमेदवारांनी पर्याय म्हणून दिलेल्या तिन्ही जिल्ह्यांऐवजी विदर्भ, मराठवाड्यातील केंद्र दिल्यामुळे ३ ते ४ हजारांचा प्रवासाचा भुर्दंड प्रत्येकाला बसला असून, त्यातच सर्व्हर डाऊन झाल्यामुळे परीक्षा एक तास उशिरा सुरू झाली. परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी २२ रोजी या, असे उमेदवारांना सांगितले, त्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला.
शहर व परिसरातील सात केंद्रांवर सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:०० वाजेदरम्यान तीन सत्रांमध्ये परीक्षा होत आहे. दोन तासांचे एक सत्र अशा तीन सत्रांमध्ये परीक्षा असेल. शेड्युल्डनुसार परीक्षेची माहिती हॉल तिकीटवर आहे. सकाळी ९:०० ते ११:०० वाजेपर्यंत पहिले सत्र, १२:३० ते २:३० दुसरे सत्र, सायंकाळी ४:३० ते ६:३० तिसरे सत्र असेल. जिल्हा प्रशासनाच्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या १३८ जागांसाठी परीक्षा होणार असून, सात परीक्षा केंद्रांवर परीक्षा होत आहे.
...या केंद्रांवर सुरू आहेत परीक्षा
इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजिनिअरिंग व मॅनेजमेंट बजाज कंपनीसमोर वाळूज, वन डायरेक्शन स्किल सोल्युशन इन्फोटेक पीईएस इंजिनिअरिंग कॉलेजजवळ, ईऑन डिजिटल झोन चिकलठाणा एमआयडीसी, एआयआयटी अक्टिव्ह इन्स्टिट्यूट ऑफ इन्फाॅर्मेशन टेक्नोलॉजी, प्लॉट नं. ८२, नाथ प्रांगण, युवान इन्फोटेक, देवानगरी, शहानूरमियाँ दर्गा परिसर, एक्सलन्स कॉम्प्युटर सेंटर, बजाज कंपनीसमोर, एमआयडीसी जलशुद्धिकरण केंद्राजवळ, वाळुज या केंद्रांवर परीक्षा सुरू आहेत.
खासगी बसेसचे दर वाढविले....
अमोल नरवडे या उमेदवाराने सांगितले, खासगी बसेसने तिकिटांचे दर ३०० रुपयांनी वाढविले आहेत. त्यातच परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगून उमेदवारांना जाण्यास सांगितले. २ ते ३ हजार खर्च करून उमेदवार आले आहेत. परत ये-जा करण्याचा खर्च काेण देणार, असा सवाल परीक्षा केंद्रचालकांना केला. तसेच उमेदवारांची तपासणी विचित्र पध्दतीने केली जात असल्याचा आरोपही त्याने केला.