दोन महिन्यांपासून वासडी सज्जावर तलाठी येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:05 AM2021-06-26T04:05:59+5:302021-06-26T04:05:59+5:30
वासडी : गेल्या दोन महिन्यांपासून वासडी सज्जावर तलाठी न आल्याने ग्रामस्थांची कामे खोळंबली आहेत. या ठिकाणी नियमित येऊ शकेल, ...
वासडी : गेल्या दोन महिन्यांपासून वासडी सज्जावर तलाठी न आल्याने ग्रामस्थांची कामे खोळंबली आहेत. या ठिकाणी नियमित येऊ शकेल, अशा तलाठ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी येथील सरपंचांनी तहसील कार्यालयाकडे केली आहे.
वासडी येथे प्रशासनाने तलाठी एस.पी. दांडगे यांची नियुक्ती केलेली आहे. मात्र, ते गेल्या दोन महिन्यांपासून येथील तलाठी सज्जाकडे फिरकलेही नाहीत, यामुळे गावातील नागरिकांना अनेक दाखल्यांसाठी, तसेच कागदपत्रांसाठी वणवण भटकावे लागत आहे. कामधंदे सोडून शेतकरी तलाठ्याला शोधत फिरत असल्याचे चित्र सध्या वासडी गावात दिसत आहे. नागरिकांनी याबाबत ओरड केल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाने याची दखल घेतली. याबाबत १३ जून, २०२१ रोजी सर्व सदस्यांनी मिळून ठराव पारित करून प्रशासनाकडे पाठविला. मात्र, याचा काहीही उपयोग झाला नाही. पीककर्जासाठीही अनेक शेतकऱ्यांना लागणारी कागदपत्रे वेळेवर न मिळाल्याने, त्यांना हकनाक त्रासाला सामोरे जावे लागले. या ठिकाणी नियमित येणारा तलाठी द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोट
वासडी तलाठी सज्जावर गेल्या दोन महिन्यांपासून तलाठी आलेला नाही. याचा सर्व गावकऱ्यांना त्रास होत आहे. याबाबत आम्ही ग्रामपंचायतमध्ये ठरावही पारित केला आहे. यानंतर, २३ जून, २०२१ रोजी मी तहसील प्रशासनाला येथे नियमित येणारा तलाठी नियुक्त करावा, या आशयाचे निवेदन दिले आहे. अद्यापही याची दखल घेतली गेली नाही.