तलाठी, कोतवालास वाळू तस्करांची बेदम मारहाण, चार आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 04:53 PM2023-03-28T16:53:06+5:302023-03-28T16:53:56+5:30

वाळू कारवाईत पोलीस व महसूल विभागात समन्वयाचा अभाव

Talathi, Kotwalas brutally beaten up by sand smugglers, four accused arrested | तलाठी, कोतवालास वाळू तस्करांची बेदम मारहाण, चार आरोपींना अटक

तलाठी, कोतवालास वाळू तस्करांची बेदम मारहाण, चार आरोपींना अटक

googlenewsNext

पैठण: अवैध वाळू वाहतूकीवर कारवाईसाठी नेमलेल्या पथकातील तलाठी व कोतवालास बेदम मारहाण करून त्यांच्या ताब्यातील वाळुचे वाहन तस्करांनी पळवून नेले. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रहाटगाव - आपेगाव रोडवर सोलनापूर येथे ही घटना घडली आहे. 

महसूल विभागाने दिलेल्या फिर्यादीवरून वाळू तस्करावर पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी या प्रकरणातील चार वाळू तस्करांना  पोलीसांनी अटक केली आहे.  अवैध वाहतूक व गौणखनिज चोरीस प्रतिबंध करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार दररोज तीन कर्मचाऱ्यांचे फिरते पथक नियुक्त करण्यात आले आहे. यानुसार सोमवारी रात्री बालानगर तलाठी रमेश फटांगडे, कोतवाल रवींद्र सोनटक्के यांचे पथक कार्यरत होते. खाजगी वाहनाने गस्त घालत असताना आपेगाव रहाटगाव रोडवर सोलनापूर गावाजवळ विनाक्रमांकाचे वाळू वाहतूक करणारे वाहन तलाठी रमेश फटांगडे व कोतवाल रवींद्र सोनटक्के यांनी अडवून चालकाकडे वाळू वाहतूक परवाना आहे का ? याबाबत चौकशी केली. 

परंतु, चालकाकडे काहीच कागदपत्रे नसल्याने वाळू भरलेले वाहन त्यांनी तहसील कार्यालयात घेण्यास चालकास सांगितले. तेवढ्यात चालकासह  अन्य दोघांनी  गाडीतून उतरून तलाठी व कोतवाला सोबत हुज्जत घालण्यास सुरवात केली. दरम्यान आणखी एकास फोन करून त्यांनी बोलावून घेतले. मोटारसायकलवर आलेल्या त्यांच्या साथीदाराने येताच तलाठी व कोतवालावर लाथा बुक्क्यांनी हल्ला केला. रात्रीच्या अंधारात मदतीस कुणी नसल्याने तलाठी व कोतवाल भेदरून गेले. मारहाण सुरू असताना चालकाने वाळूने भरलेले वाहन तेथून पळवून नेले. तलाठी कोतवालाने आरडाओरडा केल्याने वाळू तस्कर तेथून फरार झाले. 

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शंकर लाड यांनी घटनास्थळावर जात कोतवाल व तलाठी यांना घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणी तलाठी रमेश फटांगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  चार वाळू तस्करा विरोधात गौणखनिज अधिनियम, शासकीय कामात अडथळा, मारहान आदी बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपींना अटक...
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहुल, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, यांनी पोलीस उपनिरीक्षक सतिश भोसले, गोपाळ पाटील, सचिन भुमे, स्वप्नील दिलवाले, नरेंद्र आंधारे,  सुधीर वाव्हळ,  यांचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना केले. मंगळवारी दुपारी प्रतिक संजय भोज, शैलेश बाबासाहेब मानमोडे, विजय विष्णू घुले व मोहसीन मोईन शेख सर्व राहणार पैठण या चौघांना पैठण शहरातील विविध भागातून अटक केली असे पोलीस उपनिरीक्षक सतिश भोसले यांनी सांगितले.

समन्वयाचा अभाव...
पैठण तालुक्यात वाळू तस्कराच्या मुसक्या आवळण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली १ मार्च, २०२२ रोजी झालेल्या  वाळू सनियंत्रण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. या नुसार रात्र पाळीच्या पथकासोबत एक शस्त्रधारी पोलीस कर्मचारी असेल असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु गेल्या काही महिण्या पासून पोलीस व महसूल विभागाचे पथक स्वतंत्र पणे अवैध वाळू तस्करी विरोधात कारवाई करत असल्याचे दिसून आले आहे. सोमवारी रात्री झालेल्या पथका सोबत पोलीस असते तर पुढील घटना घडल्याच नसत्या... परंतु, वाळु कारवाई बाबतीत महसूल व पोलीसात एकमत नसल्याचेच समोर आले आहे.

Web Title: Talathi, Kotwalas brutally beaten up by sand smugglers, four accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.