पाच हजारांची लाच घेताना पंढरपूरचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:04 AM2021-06-23T04:04:11+5:302021-06-23T04:04:11+5:30
तक्रारदार यांनी काही दिवसांपूर्वी नवीन रो हाऊस खरेदी केले आहे. या रो हाऊसची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी त्यांनी पंढरपूर ...
तक्रारदार यांनी काही दिवसांपूर्वी नवीन रो हाऊस खरेदी केले आहे. या रो हाऊसची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी त्यांनी पंढरपूर सजाचा तलाठी डोंगरजाळ याची भेट घेतली. तेव्हा त्याने प्रती रो हाऊस सातबारा नोंद करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार आणि त्यांच्या शेजाऱ्याच्या सातबाऱ्याची नोंद करण्यासाठी सहा हजार रुपये लागणार होते. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी डोंगरजाळची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पोलीस उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गणेश धोकरट, हनुमंत वारे, हवालदार सुनील पाटील, बाळासाहेब राठोड, रवींद्र काळे, केवलसिंग घुसिंगे आणि चालक चांगदेव बागुल यांच्या पथकाने सापळा लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा तक्रारदार यांनी केलेल्या विनंतीवरून आरोपी डोंगरजाळ याने त्यांच्या कामाचे दोन हजार रुपये आणि शेजाऱ्याच्या रो हाऊसच्या कामासाठी तीन हजार असे एकूण पाच हजार रुपये मागितले. ठरल्यानुसार आरोपीने तक्रारदार यांना वळदगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. साध्या वेशातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सापळा रचलेला होता. तेथे तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाच घेताच डोंगरजाळ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले. आरोपीविरुद्ध सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.