तलाठी आत्महत्या प्रकरणाला कलाटणी; दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून पहिल्या पत्नीसह आई, भाऊ- बहिणीविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 03:23 PM2020-12-08T15:23:41+5:302020-12-08T15:29:03+5:30
सिल्लोड येथील तलाठी राहुल पांडे मृत्यू प्रकरण
सिल्लोड: येथील तलाठी राहुल पांडे यांनी 6 जून रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आता ६ महिन्यानंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. पांडे यांच्या दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पहिल्या पत्नीसह आई, चुलत भाऊ, बहीण- मेव्हणा अशा ५ जणांविरोधात कलम 306,34 भादवी नुसार सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील डोंगरगाव, अनवी येथील तलाठी सजा येथे राहुल पांडे कार्यरत होते. त्यांनी ६ जून रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. पांडे यांची दोन लग्न झाले होते. पहिल्या पत्नीने राहुलकडून फारकती घेतली होती. तिने दुसरे लग्न करून पोटगी सुरु होती. तर दुसरी पत्नी जयश्री ( रा.पश्चिम बंगाल ) सोबत पांडे यांनी 10 फेब्रुवारी 2016 मध्ये शिर्डी येथे लग्न केले होते. जयश्री यांच्या तक्रारीनुसा, या लग्नाला पांडे यांच्या घरचा विरोध होता. ते नेहमी पांडे आणि जयश्री यांना घरातून निघून जाण्यास सांगून छळ करत असत.
सातत्याने होणाऱ्या या त्रासाला कंटाळूनच पांडे यांनी सपकाळ वाडीतील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पांडे यांनी आत्महत्या केली तेव्हा जयश्री माहेरी पश्चिम बंगाल येथे होत्या. त्या येण्याआधीच अंत्यसंस्कारही उरण्यात आले. ते आत्महत्या करूच शकत नाही. त्यांच्या मरणास सासरचे लोक कारणीभूत असल्याची तक्रार जयश्री पांडे यांनी दिली. यावरून सिल्लोड शहर पोलिसांनी विजया अशोक पांडे (आई), रवींद्र प्रल्हाद पांडे ( चुलत भाऊ, रा.डोंबिवली), रीना किशोर शर्मा व किशोर रमेश शर्मा ( बहिण-मेव्हणा, रा.पुणे ) आणि वैशाली अमोल पांडे ( पहिली पत्नी, रा.पाल फाटा फुलंब्री ) यांच्यावर कलम 306, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.