लष्करात सेवा बजावलेल्या तलाठ्याने बिल्डरकडून घेतली ९० हजारांची लाच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 07:25 PM2024-09-28T19:25:17+5:302024-09-28T19:30:02+5:30

तलाठ्यासह कलेक्शन एजंट अटकेत

Talathi, who served in the army, took a bribe of 90 thousand from the builder | लष्करात सेवा बजावलेल्या तलाठ्याने बिल्डरकडून घेतली ९० हजारांची लाच

लष्करात सेवा बजावलेल्या तलाठ्याने बिल्डरकडून घेतली ९० हजारांची लाच

छत्रपती संभाजीनगर : बांधकाम व्यावसायिकाच्या प्लॉट, फ्लॅटचे प्रलंबित फेर करून देण्यासाठी ९० हजारांची लाच स्वीकारणारा सातारा-देवळाईचा तलाठी दिलीप रामकृष्ण जाधव (५५, रा. मयूर पार्क, हर्सूल) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी कार्यालयातच अटक केली. त्याचा खासगी सहायक रवी मदन चव्हाण (३१, रा. सातारा तांडा) यालाही पथकाने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे जाधवने १७ वर्षे लष्करात सेवा बजावली आहे. त्यानंतर तो महसूल खात्यात रुजू झाला.

४० वर्षीय तक्रारदार ज्योती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स येथे व्यवस्थापक आहेत. अनेक दिवसांपासून कंपनीचे १२० प्लॉट, घरांची फेरप्रक्रिया प्रलंबित होती. त्यासाठी जाधवने पैशांची मागणी केली. तक्रारदाराने आधी ३० हजार रुपये दिले होते. मात्र, जाधवने पुन्हा चव्हाणच्या माध्यमातून प्रतिफेर एक हजार असे आणखी ९० हजारांची मागणी केली. तक्रारदाराने ही माहिती एसीबी अधीक्षक संदीप आटोळे यांना दिली. आटोळे यांच्या सूचनेवरून उपअधीक्षक संगीता पाटील यांनी तपास सुरू केला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी १:३० वाजता जाधवला अटक केली. पाटील यांच्यासह अंमलदार राजेंद्र शिणकर, विलास चव्हाण यांनी ही कारवाई केली.

रुमालाने तोंड पुसण्याचा इशारा...
पथकाने गुरुवारी तक्रारदाराला पाठवून सापळा रचला होता. तेव्हा जाधवने पैसे घेतले नाहीत. काही वेळाने संपर्क साधून शुक्रवारी पैसे घेऊन बोलावले. पैसे दिल्यानंतर पथकाने तक्रारदाराला रुमालाने तोंड पुसण्याचा इशारा करण्यास सांगितले होते. जाधवने पैसे स्वीकारल्याचा इशारा प्राप्त होताच पथकाने थेट दालनात प्रवेश करत त्याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्याच्या घराची झडती सुरू होती.

तलाठ्याचा थाट, स्वत:चा खासगी ‘पीए’
जाधवने चव्हाणला खासगी पीए म्हणून नेमले आहे. चव्हाण शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे दिवसभर कार्यालयात थांबायचा. जाधव तक्रारदाराला दालनाबाहेर पाठवत ‘चव्हाणला भेटून घ्या’ असे सांगायचा. मग चव्हाण आकडे सांगत होता. कार्यालयातील अन्य कर्मचारी त्याला काही बोलण्याची हिंमत करत नव्हते.

Web Title: Talathi, who served in the army, took a bribe of 90 thousand from the builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.