पोलिसांच्या कारवाईमुळे उडाली तळीरामांची भंबेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:03 AM2021-03-08T04:03:27+5:302021-03-08T04:03:27+5:30
औरंगाबाद : दारू पिण्याची परवानगी नसलेल्या हॉटेलमध्ये दारू पिणे तळीरामांना चांगलेच महागात पडले. शहरातील क्रांती चौक, छावणी, पुंडलीकनगर, जवाहर ...
औरंगाबाद : दारू पिण्याची परवानगी नसलेल्या हॉटेलमध्ये दारू पिणे तळीरामांना चांगलेच महागात पडले. शहरातील क्रांती चौक, छावणी, पुंडलीकनगर, जवाहर कॉलनी, सिडको, वेदांतनगर, सातारा पोलिसांनी अचानक टाकलेल्या धाडीत हॉटेलचालक व मद्यपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दारू पिण्यासाठी परवानगी नसतानादेखील शहरातील अनेक लहान-मोठ्या हॉटेलमध्ये मद्यपींची व्यवस्था केली जाते. शहर पोलिसांनी आपापल्या हद्दीतील हॉटेल्स, ढाब्यांवर अचानक छापे मारले. तेव्हा ठिकठिकाणी दारू पीत बसलेले ग्राहक आढळून आले. या कारवाईमध्ये जवाहरनगर पोलिसांनी विभागीय क्रीडा संकुलसमोरील रस्त्यालगत शेर-ए-पंजाब या हॉटेलवर छापा मारला. तेव्हा हॉटेलचालक मनजीतसिंग कर्तारसिंग संधू हा ग्राहकांना दारू पिण्यासाठी जागा देऊन त्यांना सुविधा पुरविताना आढळून आला. पुंडलीक ठाण्याच्या हद्दीत हॉटेल निसर्गमध्येही अनेक ग्राहक दारू पीत बसले होते. पोलिसांनी हॉटेलमालक अशोक बांगर व व्यवस्थापक भगवान सातपुते यांच्यासह सहा जणांविरुद्ध कारवाई केली.
मध्यवर्ती बसस्थानकासमोर हॉटेल काइट्सवर क्रांती चौक ठाण्याच्या पोलिसांनी अचानक छापा मारला, तेव्हा तेथेही ग्राहक दारू पित बसलेले दिसून आले. हॉटेल व्यवस्थापक सागर बोराडे याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जाधववाडी परिसरात शाकाहारी व मांसाहारी जेवणासाठी असलेल्या जाधव बंधू हॉटेलमध्येही विनापरवाना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे शुक्रवारी सिडको पोलिसांना आढळून आले. हॉटेलचालक दीपक गवई यासह सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पडेगाव येथील हॉटेल सूर्यामध्येही विनापरवाना दारू पीत असलेले ग्राहक आढळून आले. छावणी पोलिसांनी हॉटेलचालक अनिल म्हस्के याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सातारा परिसरातील हायकोर्ट कॉलनीच्या बाजूला हॉटेल माधुर्यमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत हॉटेलचा व्यवस्थापक संजय जाधव याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रेल्वे स्टेशन परिसरातील कबाब जंक्शन हॉटेलमध्ये ग्राहकांना दारू पिण्यासाठी पाणी व इतर सुविधा पुरविणारा व्यवस्थापक ओवेस अंजुम हुसेन याच्याविरुद्ध वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट....
एकाच दिवशी हॉटेलवर छापे
पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार शहरातील जवळपास सर्वच ठाण्यांच्या पोलिसांनी शहरातील दारू पिण्याची परवानगी नसलेल्या हॉटेलवर ५ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास छापे मारून कारवाई केली. तथापि, आपल्या हद्दीतील कोणत्या हॉटेलमध्ये विनापरवाना दारू पिण्याची व्यवस्था करून दिली जाते, याची बित्तंबात संबंधित ठाण्याच्या पोलिसांना माहिती आहे. मात्र, वरिष्ठांच्या आदेशामुळे पोलिसांनी शुक्रवारी रात्री अशा हॉटेलविरुद्ध कारवाईचा फार्स केला, असे हॉटेलचालकांमध्ये बोलले जात आहे.