मनपा आयुक्तांच्या तीन आठवडे सुटीच्या पार्श्वभूमीवर बदलीची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:42 AM2019-01-11T11:42:05+5:302019-01-11T11:49:17+5:30
आयुक्तांना पालिकेत बदली होऊन सात महिन्यांचा कालावधी झाला आहे.
औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली आहे. नगरविकास खात्याच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती प्रशासकीय वर्तुळात आज दिवसभर होती. याला प्रशासकीय दुजोरा अद्याप मिळू शकलेला नाही.
पुढच्या आठवड्यात आयुक्त तीन आठवडे रजेवर जाणार आहेत. या काळात त्यांचा पदभार जिल्हाधिकारी किंवा पालिकेतील इतर अधिकाऱ्यांकडे दिला जाईल; परंतु या रजेनंतर आयुक्त पुन्हा पालिकेत येणार नाहीत, त्यांच्या बदलीची ऑर्डरच पालिकेत येईल. अशी कुणकुण प्रशासन तसेच राजकीय वर्तुळाला लागली आहे.
आयुक्त तीन आठवडे रजेवर जाणार असल्याने सर्वसाधारण सभेच्या तारखा मागे-पुढे करण्याप्रकरणी सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये गुरुवारी दुपारी खल सुरू होता. दोन सभा घ्यावयाच्या असल्यामुळे सात दिवसांचे अंतर महत्त्वाचे आहे. आयुक्त रजेवर जाण्यापूर्वीच त्या सभा झाल्यास काही महत्त्वाची प्रकरणे मार्गी लागतील. त्यामुळे सभेच्या तारखा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होती.
आयुक्तांना पालिकेत बदली होऊन सात महिन्यांचा कालावधी झाला आहे. कचरा समस्या, पाणीपुरवठा, १०० कोटी रस्त्यांची निविदा, ९० कोटींची कचरा प्रक्रिया यंत्रणा खरेदी करणे, शहर बससेवा सुरू करण्यासारखे महत्त्वाचे निर्णय या काळात झाले असले, तरी पूर्ण क्षमतेने ते मार्गी लागलेले नाहीत. आयुक्तांची बदली झाली तर येणाऱ्या आयुक्तांना पुन्हा या सगळ्या बाबी नव्याने समजून घेऊन काम करावे लागेल.
१८ जानेवारीपासून परदेश दौऱ्यावर
पंधरा दिवसांच्या रजेवरून परतलेले आयुक्त १८ जानेवारीपासून परदेश दौऱ्यावर जात आहेत. तीन आठवड्यांच्या काळात ते कॅलिफोर्निया येथे स्वस्त घरकुल योजनेचा अभ्यास करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कचरा प्रश्नावर उपाय काढण्यासाठी मे महिन्यात निपुण यांची मनपा आयुक्तपदी बदली केली. दरम्यान, डॉ. निपुण यांना पदोन्नतीही मिळाली. त्यामुळे त्यांची मंत्रालयात नगरविकास खात्यात सचिव म्हणून बदली होण्याची चर्चा आहे. आयुक्त २५ डिसेंबरपासून दहा दिवसांच्या रजेवर होते, त्यात रजेतच त्यांनी रजा वाढवून घेतल्यानंतर गुरुवार, १० जानेवारी रोजी ते मनपात आले. आता पुन्हा ते १८ जानेवारीपासून ते ४ फेबु्रवारीपर्यंत कॅलिफोर्नियाच्या सरकारी दौऱ्यावर जात आहेत.