टँकर ८० टक्क्यांनी घटले!
By Admin | Published: May 29, 2017 12:29 AM2017-05-29T00:29:49+5:302017-05-29T00:32:56+5:30
जालना : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात दोन वर्षांत झालेल्या जलसंधारणाची काम आणि मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे भूजलपातळीत दोन मीटर वाढ झाली आहे.
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात दोन वर्षांत झालेल्या जलसंधारणाची काम आणि मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे भूजलपातळीत दोन मीटर वाढ झाली आहे. परिणामी अनेक गावांमध्ये आजही पाणी उपलब्ध असून, मागील वर्षीच्या तुलनेत टँकरची संख्या ८० टक्क्यांनी म्हणजेच सव्वाचारशेने घटली आहे.
जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात २१२ तर दुसऱ्या टप्प्यात १८६ गावांमध्ये जलसंधारणाची कामे झाली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शासकीय यंत्रणेबरोबर अनेक खाजगी कंपन्या व सेवाभावी संस्थानी जलसंधारणाच्या कामांसाठी पुढाकार घेतला.
वर्र्ष २०१५-१६ मध्ये लोकसहभागातून १७ कोटी रुपये खर्चून ५५ लाख घनमीटर गाळ उपसा करण्यात आला, तर २८८ किलोमीटर नालाखोलीकरण करण्यात आले. त्यामुळे ४९ हजार ५५० हेक्टर सिंचनाखाली आले. त्यातच मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमधील शासकीय व खाजगी विहिरींमध्ये मे, जूनमध्ये पाणी उपलब्ध आहे. याचा थेट परिणाम उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे वाढणाऱ्या टँकरच्या संख्येवर झाला आहे. मागील वर्षी मे मध्ये ग्रामीण भागात तब्बल ५४८ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. हा आकडा यंदा केवळ १२२ वर आला आहे. यामध्ये खाजगी टँकरची संख्या १०१, तर शासकीय टँकरची संख्या केवळ २१ आहे.
भोकरदन तालुक्यात मागील वर्षी १९९ वर गेलेली टँकरची संख्या यंदा केवळ ४६ आहे. बदनापूर तालुक्यातील २९ गावांना सध्या २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, ही संख्या मागील वर्षी १६४ होती. घनसावंगी व अंबड तालुक्यातील सहा गावे मिळवून केवळ आठ टँकर सुरू आहेत. हा आकडा मागील वर्षी १६३ वर पोचला होता. परतूर व मंठ्यातील सात गावांमध्ये सध्या सात टँकर सुरू आहेत, ही संख्या मागील वर्षी ९५ वर पोचली होती. जाफराबाद तालुक्यात गत वर्षी १५३ टँकर सुरू होते, यंदा हा आकडा केवळ ३१ आहे. एकंदरीत जिल्ह्यातील दुष्काळाच्या दाहकतेवर फुंकर घालण्याचे काम जलयुक्त शिवार अभियान व लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या चळवळीमुळे शक्य झाले आहे.